दैनंदिन सवयी.. आढावा आणि आवश्यक बदल


आपल्या दैनंदिन आयुष्यामधे अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण अगदी दररोज करत असतो. किंबहुना, त्या गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात, की नकळत त्या गोष्टींची सवयच होऊन जाते. पण अश्या सवयींचे, कळत-नकळत, आपल्या मनावर आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम मात्र आपल्या लक्षात येतातच असे नाही. त्यामुळे आपल्या नित्याच्या सवयींकडे लक्ष देऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल केल्यास, त्यांचे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि मानसिक तणाव सहज टाळता येऊ शकतात.

अनियमित झोप : झोपेच्या वेळेमध्ये काही ना काही कारणांनी सतत बदल होत राहणे, हे आजकालच्या आपल्या धकाधाकीच्या आयुष्याचे प्राथमिक वैशिष्ट्य बनले आहे असे म्हटले तरी त्यात फारसे वावगे वाटणार नाही. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध मंडळींपर्यंत सगळ्यांना याचा अनुभव येत असतो. मुलांमध्ये, अभ्यास, सोशल नेट्वर्किंग, मित्रमंडळींसोबत बाहेर भटकंती अशी अनेक कारणे असतात, तर मोठ्यांसाठी, कामाच्या deadlines, घरात आलेली पाहुणेमंडळी, सण-समारंभ अश्या अनेक कारणांनी झोपेची ठराविक वेळ सांभाळणे अवघड होऊन जाते. पण झोपेच्या वेळेच्या अनियमिततेची सवय करून घेणे मात्र शरीराला आणि मनाला अपायकारक ठरू शकते. सतत जागरण होत असल्याकारणाने शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळू शकत नाही. त्याचा परिणाम आपल्या कामावर होत असतो. आणि कामांमध्ये सतत काही ना काही त्रुटी राहून जात असल्याने मानसिक तणाव जाणवायला लागतो. त्यामुळे झोपेची वेळ शक्यतो नियमितपणे पाळायचा प्रयत्न करावा. झोपेच्या वेळेच्या साधारण अर्धा तास आधीपासून फोन, इंटरनेट, टीव्ही या गोष्टी बाजूला ठेवाव्यात.

दुसऱ्या दिवशी किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये करायच्या असलेल्या कामांची यादी डोक्यामध्ये घोळवत बसण्यापेक्षा आपल्या डेली प्लानर मध्ये त्या गोष्टींची वेळीच नोंद करून ठेवण्याची सवय आत्मसात करावी. त्यामुळे समय-सीमेनुसार कामाचे आयोजन करणे सोपे होते. महत्वाच्या appointments, तारीखा, इत्यादींची नोंद करून ठेवलेली असली म्हणजे त्या त्या दिवसांसाठी आवश्यक असलेली तयारी आधीपासूनच करून ठेवता येते आणि ऐन वेळेवर होणारी धावपळ, गोंधळ सहज टाळता येऊ शकतो.

व्यायाम : व्यायाम, आपल्या शरीर-स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याकरिता सुद्धा आवश्यक आहे. मग गृहिणी असोत, मुले असोत, ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी असोत किंवा निवृत्त सिनिअर सिटीझन असोत, सगळ्यांनाच व्यायाम आवश्यक आहे. मुद्दाम व्यायामाकरिता घराबाहेर पडणे शक्य नसेल, तर ऑफिसला जाताना किंवा बाजारात जाताना शक्य असेल तर चालत जावे, लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करावा.

कित्येकदा घरातल्या कामांच्या व्यापात किंवा काही कामाने घराबाहेर पडताना आपण सकाळचा नाश्ता टाळत असतो, किंवा हाताला येईल ते पटकन तोंडात टाकून वेळ मारून नेत असतो. ही सवय आवर्जून बदलायला हवी. breakfast किंवा सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी इंधनाचे काम करीत असतो. शरीराला काम करण्यासाठी लागणारी उर्जा मिळण्यासाठी सकाळचा नाश्ता महत्वाचा आहे. सकाळी धावपळ होत असेल तर नाश्त्याची तयारी आदल्या रात्रीच करून ठेवावी.

कित्येकदा, आपल्याला विश्रांतीची आवश्यकता आहे हेच मान्य करायला आपण तयार नसतो, कारण कामांची यादी किंवा त्यासाठी असणारी समयसीमा सतत डोळ्यापुढे दिसत असते. पण स्वतःसाठी वेळ देणेही तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येकाची relaxation ची कल्पना वेगळी असते. कुणाला भटकंती आवडते, कुणाला वाचनाचा, गाण्याचा छंद असतो. आपले छंद जोपासावेत, आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ द्यावा, त्यामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते.

Leave a Comment