कठोर आई-वडिलांची मुले अभ्यासात कच्चीच – पाहणीचा निष्कर्ष


मुलांना शिस्त लावायची तर त्यांच्याशी कठोरपणे वागणे, हा एकमवे मार्ग नाही. ज्या मुलांना आई-वडिलांची बोलणी आणि कठोरता यांचा सामना करावा लागतो, ते अभ्यासाऐवजी सेक्स आणि गुन्हेगारीत सामील होतात, असे अमेरिकेतील एका पाहणीतून आढळले आहे. “चाईल्ड डेव्हलपमेंट” नावाच्या अमेरिकी नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.

जी मुले कठोर वातावरणात मोठी होतात, तीच आपला होमवर्क टाळून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत खेळायला जातात, असे पीटसबर्ग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या पाहणीत दिसून आले. या संशोधकांनी 12 ते 21 वर्षांच्या 1500 मुलांची पाहणी केली. आई-वडिलांकडून मुलांना दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शिक्षांचा त्यात अभ्यास करण्यात आला. तसेच, या मुलांचे त्यांच्या मित्रांशी होणारे संभाषण, गुन्हेगारी विषयांवरील त्यांचे विचार आणि लैंगिक वर्तन यांचेही निरीक्षण करण्यात आले.

यातून दिसून आले, की कठोर वातावरणात वाढलेली 7 व्या इयत्ते शिकणारी मुले दोन वर्षांनंतर आई-वडिलांच्या नियमांऐवजी स्वतःच्या मित्रांना अधिक महत्त्व देतात. यातील मुली सेक्सकडे वळतात, तर मुले गुन्हेगारीकडे वळतात.

“मुलांच्या संगोपनात लोक सहसा दोन पद्धती अनुसरतात. एक तर ते मुलांशी अत्यंत कठोर वागतात, किंवा ते अत्यंत मोकळेपणाने वागतात. मात्र हे दोन्ही दृष्टिकोन चुकीचे आहेत. आई-वडिलांनी मुलांना उत्तेजन देणारे वातावरण निर्माण केले पाहिजे. त्यात योग्य-अयोग्यची मर्यादा निश्चित असावी, मात्र शारीरिक शिक्षेला जागा नसावी,” असे या लेखात म्हटले आहे.