महागड्या चहाबाबत थोडेसे


पावसाळा असो, हिवाळा की उन्हाळा. चहाची तलफ आली की कुठलाच ऋतू अथवा वेळ मध्ये येत नाही. चहाचे चाहते जगभर आहेत व हर एकाची आवडही भिन्न आहे. त्यामुळे चहा अनेक प्रकारे आणि अनेक वस्तू वापरून बनविला जातो. आले. वेलदोडा घातलेला चहा, मसाला चहा, पुदीना चहा, अगदी जुईच्या कळ्या घालून बनविलेला चहा असे चहाचे अनेक प्रकार आहेत. चहा चा उगम चीनमधला असला तरी जगातील बहुतेक देशांनी त्याला आपलासा केला आहे. अर्थात महागड्या चहांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. मात्र पाच रूपये कपापासून शेकडो डॉलर्स पर्यंत तो विकला जातो. महागड्या चहांविषयी आपण येथे थोडी माहिती घेणार आहोत.

जगात आत्तापर्यंत सर्वाधिक महाग चहा विकला गेला आहे त्याचे नाव आहे पीजीटिप्स डायमंड टी. या कंपनीच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त या चहाचे खास पॅक काढले गेले व या एका पॅकची किंमत होती १३ हजार डॉलर्स. या चहाच्या प्रत्येक टीबॅगवर २८० हिरे जडविले गेले होते व अशी एक टीबॅग तयार करायला ३ महिने लागत होते. अर्थात ही पॅकेट विकून आलेला पैसा दान करण्यासाठी वापरला गेला असेही सांगितले जाते.


पांडा डंग टी- हा चीनमधला खास चहा असून त्याची ओळख त्याच्या नावातच लपलेली आहे. पांडा हा चीनचा राष्ट्रीय प्राणी. या चहाचा खास स्वाद व वासावरूनच त्याची ओळख पटते.

डॉ. हॉग पाओ टी – हा चहाही चीनमधलाच आहे. चीनच्या फूजियान वुईसन भागात तो पिकविला जातो. हा चहा आरोग्यदायी असून डॉ. होंग पाओ यांनी या चहाची खास झाडे विकसित केली होती. या चहाला जीवनदायी चहा मानले जाते.

सिल्व्हर टिप्स इंपिरियर- भारतातला हा चहा पौर्णिमेच्या काळात खुडला जातो. त्याची शेती विशेष ठिकाणी होते. याच्या पानावर चंदेरी रंगाचे डाग असतात म्हणून त्याला सिल्व्हर टिप्स असे म्हटले जाते हा चहाही खूपच महाग असतो. केरळ च्या मुन्नार भागात हा चहा पिकतो.


यलो गोल्ड बडस- हा चहा सिंगापूरमध्ये पिकविला जातो व वर्षातून एकदाच त्याचे उत्पादन घेतले जाते. सोन्यात मिसळून हा चहा फक्त सिंगापूरमध्येच विकला जातो. सोन्यामुळे हा चहाही महागडा आहे. कपाला २०० डॉलर्स अशी त्याची किंमत आहे.

तेगुआनयिन टी- या चहाचा संबंध बौद्ध भिक्षू तेगुआन याच्याशी आहे म्हणजे त्याचे नांव या चहाला दिले गेले आहे. या चहाचे वैशिष्ट म्हणजे त्याचा रंग व किंमत. हा चहा कितीही उकळला तरी त्याला रंग येत नाही मात्र वैशिष्ठपूर्ण स्वाद येतो.

Leave a Comment