बुलेटप्रूफ काचेत बंद होणार आयफेल टॉवर


जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला फ्रान्सचा मानबिंदू आयफेल टॉवरच्या चारी बाजूंनी बुलेट प्रूफ काचेची भिंत उभारली जाणार आहे. दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन टॉवरच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेला असल्याचे समजते. या वर्षअखेर ही भिंत उभी केली जाणार आहे.

शहराचे महापौर फ्रांन्स्वा मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी युरो २०१६ मध्ये टॉवरच्या चारी बाजूंनी धातूच्या तारांचे फेन्स केले गेले होते. त्या जागीच आता अडीच मीटर उंचीची काचेची भिंत उभी केली जात आहे. शहरातील ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तूंच्या सुरक्षेसाठी अशी उपाययोजना केली जात आहे.

१८८९ साली अलेक्झांडर गुस्ताव आयफेल यांनी या टॉवरची उभारणी केली होती. त्या वर्षी फ्रान्स क्रांतीचा १०० वा वर्धापनदिन होता व त्यानिमित्ताने येथे वर्ल्ड फेअरचे आयेाजन केले गेले होते. मेळ्याला येणार्‍यांच्या स्वागतासाठी खास कमान बनविण्याचे काम आयफेल यांच्याकडे सोपविले गेले होते त्यावेळी त्यांनी या टॉवरची उभारणी केली. १९५७ साली तो आणखी उंच बनविताना त्यावर ६५ फूट उंचीचा अँटेना लावला गेला. दरवर्षी किमान ७० लाख पर्यटक या ३२४ मीटर उंचीच्या टॉवरला भेट देण्यासाठी येतात.

Leave a Comment