गर्जेल तो पडेल काय?


जे ढग फार गडगडाट करतात त्यातून पाऊस पडतोच असे नाही. असे ढग फक्त गडगडाट करून पुढे निघून जातात. महाराष्ट्रात शिवसेनेचे राजकारण आणि तिचा असलेला भाजपा सरकारचा पाठिंबा या संबंधात असेच काही घडत आहे. बुधवारी रात्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले एक दोन अपवाद वगळता सगळेच मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा बंगल्यावर गेले. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी मा. उध्दवजी ठाकरे यांनी सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे म्हटले होते आणि त्यानंतर हा प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेचे हे सारे मंत्री सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून घेण्याची घोषणा करण्यासाठीच वर्षा बंगल्यावर गेले असावेत असा लोकांचा समज झाला. असा समज पक्का होण्यामागे आणखी एक कारण होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातानाच हे ढग जास्त गडगडाट करायला लागले होते. रामदास कदम यांनी आपल्या खिशात नेहमीच राजीनामा असतो असे सांगितले होते. तेव्हा हे सगळे मंत्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खिशातले राजीनामे मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर टाकणार असा कोणाचाही समज झाला असता.

प्रत्यक्षात घडले मात्र वेगळेच. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची कर्जे माफ करावीत अशी मागणी केली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात तिथल्या शेतकर्‍यांना कर्जमाफ करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मग भारतीय भारतीय जनता पार्टीला शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याची कल्पना मान्य असेल तर महाराष्ट्रातल्या भाजपा सरकारनेही महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची कर्जे माफ करावीत अशी मागणी करण्यासाठी हे वरिष्ठ स्तर शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. महाराष्ट्रात शेतकर्‍यांची सहानुभूती मिळवण्यासाठी शिवसेनेने हा डाव टाकला. त्याचा फायदा शिवसेनेला किती झाला हे निवडणुकीत दिसून येईलच. परंतु या मागणीपेक्षासुध्दा शिवसेनेच्या मंत्र्यांनी भरपूर गर्जना करून शेवटी राजीनामे दिलेच नाहीत या गोष्टीलाच महत्त्व आले. त्यातल्या त्यात रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याआधी पत्रकारांशी बोलताना भाजपावर जी शिव्यांची लाखोली वाहिली ती ऐकल्यानंतर हे मंत्री राजीनामे देणारच अशी खात्री वाटली होती. परंतु शिवसेनेला एका बाजूला भाजपावर टीकाही करायची आहे आणि दुसर्‍या बाजूला लाचारीने सत्तेतही रहायचे आहे. हेच पुन्हा उघड झाले.

एवढी लाचारी असूनही शिवसेनेचे नेते आणि खुद्द सेनाप्रमुख भाजपावर राळ उडवण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि तशी ती उडवताना शब्दही राखून ठेवत नाहीत. भाजपाचे सरकार नोटीस पिरियडवर आहे अशी घोषणा उध्दव ठाकरे यांनी केली असली तरी शिवसेनेच्या या इशार्‍याला नोटीस म्हणावे की नाही हा प्रश्‍न पडतो. कारण नोटीस पिरीयडला काळाचे बंधन असते. आपण कधीतरी नोकरी सोडणार आहोत अशी नोटीस देऊन आपल्याला आवडेल तितके दिवस नोकरीत राहता येत नसते. नोटीस देताना किती दिवसांचा पिरीयड आहे याचा उल्लेख करावा लागतो आणि त्या काळानंतर नोकरी आपोआप संपुष्टात येत असते. पण शिवसेनेने भाजपाला दिलेली ही नोटीस भलतीच विपरीत दिसत आहे. तिचा काळ किती हे तर नोटीस देणार्‍याने सांगितलेच नाही. पण नोटीस देणारे नोकर मात्र वारंवार नोटीसचा उल्लेख करून स्वतःचे हसे करून घ्यायला लागले आहेत. दुसर्‍या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या या नोटिसीने थोडेसेही विचलित न होता आपले सरकार पाच वर्षे नक्की टिकणार अशी हमी देत आहेत.

शिवसेनेचा हा पाठिंबा आणि नोटीस या गोष्टी हास्यास्पद ठरल्या आहेत. कारण आपण फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरी हे सरकार पडणार नाही हे त्यांना माहीत आहे आणि तरीसुध्दा ते सरकार पाडण्याच्या वल्गना करायला लागले आहेत. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे या अवस्थेत एक वेगळा राजकीय डाव खेळत आहेत. तो कितपत सफल होणार आहे हे काळच ठरवणार आहे. परंतु एका बाजूला सत्तेत राहून सत्तेची फळेही चाखायची आणि दुसर्‍या बाजूला विरोधी पक्षालासुध्दा लाजवेल अशा भाषेत सरकारवर कोरडे ओढायचे. असे कोरडे ओढून राज्यातील जनतेच्या मनातला भाजपावर असलेला रागही वसूल करून लोकांची मते आकृष्ट करायची असा हा डाव आहे. तो यशस्वी झाला तर उध्दव ठाकरे हे शरद पवारांपेक्षाही निष्णात राजकारण धुरंधर नेते ठरणार आहेत. पण हा डाव फसला तर उध्दव ठाकरे हे थट्टेचा विषय बनणार आहेत. मात्र हा डाव टाकत असतानाच ते मोठी जोखीम घेत आहेत. सरकारवर ताशेरे झाडत असतानाच ते सत्तेतही राहिलेले आहेत. त्यामुळे आपली प्रतिमा खराब होत आहे हे त्यांना कळत आहे आणि तीच खरी जोखीम आहे. भाजपाचे सरकार लोकांच्या मनातून उतरलेच तर महाराष्ट्रात उध्दव ठाकरेंचा डाव यशस्वी झाल्यास तेच मुख्यमंत्री होणार आहेत. पण त्यांचा डाव हुकला तर मात्र शिवसेनेची लोकप्रियता घसरायला लागणार आहे. महाराष्ट्रात कोणताही राजकीय पक्ष स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. परंतु उध्दव ठाकरे यांना मात्र तशी खात्री वाटत आहे. ती त्यांची भावना मोठ्या धाडसाचे द्योतक आहे.

Leave a Comment