कॅशलेस व्यवहार : साडेसात लाख नागरिकांना ११७ कोटींचे बक्षिस


नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विविध लकी ड्रॉ योजना जाहीर केल्या होत्या. या लकी ड्रॉ आणि डिजिधन व्यापार योजनेंतर्गत ७ फेब्रुवारीपर्यंत सुमारे ७ लाख ६० हजार उपभोक्ता आणि दुकानदारांना सुमारे ११७ कोटी ४० लाख रुपयांचे बक्षिस वितरण करण्यात आले आहे; अशी माहिती नीति आयोगाकडूनदेण्यात आली.

नीति आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनांमध्ये महिला आणि पुरूषांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. ताजा आकडेवारीनुसार महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या पाच राज्यांमधील विजेत्यांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. कॅशलेस व्यवहार करणार्‍या विजेत्यांमध्ये १२ ते ३० वर्षे वयोगटात असणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह इतरांनीही सक्रीय सहभाग नोंदविल्याने डिजिटल व्यवहार करण्यात अडचण येत असल्याचा समज दूर झाला आहे.

या दोन्ही योजना १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत.

Leave a Comment