एफ १६ च्या मेक इन इंडियाला ट्रंप यांचा खोडा


अमेरिकन रक्षा उत्पादक कंपनी मार्टिन लॉकहीडने त्यांची एफ १६ ही लढावू विमाने भारताच्या मेक इन इंडिया योजनेअंतर्गत भारतात उत्पादित करण्याची जी योजना आखली आहे त्याला अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून खोडा घातला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉकहीड मार्टिनच्या या प्रस्तावाला माजी अध्यक्ष ओबामा यांनी संमती दिली होती मात्र ट्रंप यांनी त्यावर पुनर्विचार करावा लागेल असे सांगून कंपनीच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवली आहे.

अमेरिकन संरक्षण दलाकडून एफ १६ विमानांची मागणी कमी झाल्यानंतर कंपनीने त्यांच्या टेक्सास येथील प्रकल्पात एफ १६ ऐवजी अमेरिकन रक्षादलाला आवश्यक असलेल्या एफ ३५ विमानांचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला असून एफ १६ चे उत्पादन भारतात करण्याची योजना आखली आहे. भारताने त्या बदल्यात त्यांना १०० विमानांची ऑर्डर देण्यासंदर्भात बोलणी केली आहेत. मात्र ट्रंप यांनी सत्तेवर येताच ज्या अमेरिकन कंपन्या अमेरिकेबाहेर उत्पादन करून अमेरिकेत उत्पादन विक्री करतील त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. लॉकहीड मार्टिन कंपनीने ट्रंप प्रशासनाशी चर्चेत एफ १६ विमाने भारतात बनली तरी ती अमेरिकेत विकली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे मात्र तरीही ट्रंप यांनी या प्रस्तावावर पुर्नविचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

समजा ही योजना कार्यान्वित झाली नाही तर त्याचा विपरित परिणाम बोईंग, नॉर्थरोप व अन्य कंपन्यांशी भारताने केलेल्या संरक्षण करारावरही पडणार आहे.

Leave a Comment