मासे व्यवसायातून कोटयावधींची कमाई करणारे वर्सोवा


देशातील अनेक गांवात आजही पाणी, वीज या सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत व अनेक गावांना बेरोजगारीची समस्या भेडसावते आहे. याच पार्श्वभूमीवर एक गांव असेही आहे जेथे चार हजार घरे आहेत मात्र गावाची कमाई वर्षाला ४०० कोटींची आहे. मुंबईजवळचे वर्सोवा कोळीवाडा हे ते गांव आहे. जुन्या काळी वेसावा हे कोळ्यांचे गांव म्हणूनच ओळखले जात होते.कधीमधी मुंबईला गेलोच तर या गावाला भेट देणे हा एक चांगला अनुभव आहे.

या गावात फक्त मासेमारी व विक्रीचा व्यवसाय चालतो. म्हणायलाच हे खेडे आहे. कारण गावात समृद्धीमुळे बहुमजली इमारती आहेत. पश्चिम किनार्‍यावर वडांच्या झाडांच्या जंगलात वसलेल्या या गावाची जीवनशैली वेगळीच आहे. जगात सर्वत्र कामाची सुरवात सकाळी होत असते पण कोळीवाड्यात दुपारी दोन नंतर कामाची लगबग सुरू होते कारण या वेळी मासेमारीसाठी गेलेल्या बोटी किनार्‍यावर परततात. या गावात मासेमारी करणारी ३०० गलबते असून कोल्ड स्टोरेज तसेच बर्फाचा कारखानाही येथे आहे.

येथील मासळी बाजारावर महिला राज आहे. मासेमारी करून कोळी परतले की या महिला मासे खरेदी करून त्यांची विक्री करण्याचे काम करतात. शिल्लक राहिलेले मासे क्रॉफर्ड मार्केटला निर्यातीसाठी पाठविले जातात. येथे कोळी लोकांच्या तीन संघटना आहेत त्यातील कोळी महासंघ ही सर्वात जुनी संस्था आहे.

या गावात ४ हजार कोळी आहेत. मासे विक्रीसाठी सोसायटी किमान दर ठरवून देते व त्यापेक्षा कमी किमतीला मासे विकता येत नाहीत. या उद्योगामुळे येथे ५ हजार जणांना रोजगार मिळतो. परंपरेने पुरूष प्रधान व्यवसाय मानला गेला असला तरी यात महिलांची भागीदारी ८० टक्के आहे. दररोज २५ ते ३० गलबते मासे पकडून आणतात व एका गलबतात सरासरी ३ लाख रूपये किमतीचे मासे असतात. गावाने कचरा व्यवस्थापनही कसोशीने सांभाळले आहे. २००५ पासून येथे दरवर्षी फिश फेस्टीव्हलचे आयेाजन केले जाते व साधारण ६० स्टॉल्स लागतात. प्रत्येक स्टॉल या काळात ५ ते ६ लाखांची कमाई करतो.

Leave a Comment