बचत खात्यातून रक्कम काढण्याचे निर्बंध होणार शिथिल


नवी दिल्ली : एका आठवड्यात बचत खात्यांमधून रक्कम काढण्याची २४ हजार रुपयांपर्यंतची मर्यादा दि. २० फेब्रुवारीपासून वाढविण्यात येणार असून ती ५० हजार रुपयांपर्यंत आणण्यात येणार असल्याचे संकेत रिझर्व बँकेने दिले आहेत. ही मर्यादा दि. १३ मार्च पर्यंत लागू राहणार आहे. त्यानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा असणार नाही; असेही बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी निश्चलनीकरणाची प्रक्रिया संपत आली असून लवकरच आर्थिक व्यवहारांवरचे निर्बंध पूर्णपणे शिथील केले जातील, असे यापूर्वीच सांगितले आहे. त्यानुसार व्यवहारांवर ८ नोव्हेंबरनंतर घालण्यात आलेले निर्बंध जवळपास शिथील करण्यात आले आहेत. मात्र बँकेतील बचत खात्यातून आठवड्याला २४ हजार किंवा महिन्याला ९६ हजार रूपये काढण्याची मर्यादा कायम आहे.

नवीन चलनाचा पुरवठा सुरळीत करण्यात बँकेला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत होत आहेत. बचत खात्यावरील निर्बंध उठविल्यानंतर आर्थिक परिस्थिती मूळपदावर येण्यास मदत होणारआहे; असे शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment