विदेशातील १६ हजार २०० कोटींचा काळा पैसा उघड: जेटली


नवी दिल्ली: काळ्या पैशाबाबत ‘ग्लोबल लीक्स’कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशीदरम्यान तब्बल १६ हजार २०० कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आला आहे. मागील दोन वर्षांत एचएसबीसी बँक खात्यात जमा असलेल्या ८ हजार २०० कोटी रुपयांच्या रक्कमेवर कर लागू करण्यात आला आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत दिली.

राज्यसभेत अर्थमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरात ते म्हणाले, ‘इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इंव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’कडून (आयसीआयजे) जारी करण्यात आलेल्या भारतीयांच्या विदेशी खात्यांमध्ये ८ हजार कोटी रुपये आढळले आहेत. मात्र, भारतीयांनी देशाबाहेर आणखी किती काळा पैसा जमा केला आहे, याचे अनुमान लावता येऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

जेटली म्हणाले, विदेशांमध्ये भारतीयांकडून जमा करण्यात आलेला काळा पैसा पुन्हा भारतात आणण्यासाठी सरकार कटीबद्ध असून त्या दिशेने संभाव्य ती सर्व पाऊले उचलण्यात येत आहेत. यासाठी ‘ब्लॅक मनी ऐंड इंपोजिशन ऑफ टॅक्स -२०१५ हा कायदा लागू करण्यात आला आहे. यात विदेशांमध्ये काळा पैसा जमा करणार्‍यांविरोधात कडक नियम लागू करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment