देशाच्या बँकींगच्या इतिहासात प्रथमच बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता पंजाब नॅशनल व बँक ऑफ बडोदा या दोन बड्या राष्ट्रीय बँकांनी बिझिनेस न्यूज चॅनल टीव्ही १८ वर व्यक्त केली आहे.
बचत खात्यावरील व्याजदरात कपात शक्य
देशात ८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटबंदीनंतर बँकांकडे नोटांच्या चळती जमा झाल्या आहेत. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर कर्ज व्याजदरात कपात केली गेली आहे मात्र बचत खात्यावरील व्याजदर कमी न केल्याने बँकांपुढे मोठेच संकट उभे राहिले आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर बचत खात्यावरील व्याजदरात कपात करणे आवश्यक असल्याचे मत पंजाब नॅशनल बँकेचे सीईओ व बँक ऑफ बडोदा प्रमुखांनी व्यक्त केले आहे.
देशातील सर्वसामान्य नागरिक त्यांचा पैसा बचत खात्यात जमा करत असतात. या खात्यावर ४ ते ६ टक्के व्याज दिले जाते व दीर्घकाळ हेच व्याजदर कायम आहेत. महसूलात घट कमी , अर्थशिस्त व महागाई दर कमी होणे या सकारात्मक बाबी आहेत मात्र त्यासाठी सध्या तरी बचत व्याजदर कमी करणे हाच चांगला पर्याय असल्याचे या अधिकार्यांचे म्हणणे आहे.