आता वाद जन्मतारखेचा

काही महापुरुष आपल्या आयुष्याकडे फार वेगळ्या पध्दतीने बघत असतात. आपले गुरु आणि आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे लोक यांच्याविषयी त्यांच्या मनात एवढी कृतज्ञता असते की काही महापुरुष आपल्या गुरुचे आडनावसुध्दा आपले आडनाव म्हणून स्वीकारतात. संत एकनाथांनी एका जनार्दनी अशी नाममुद्रा स्वीकारून आपले गुरु जनार्दन स्वामी यांना अजरामर करून टाकले. तसेच भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुुंडे यांच्या मनात श्री. शरद पवार यांच्याविषयी एवढा आदर होता की गोपीनाथ मुंडंंेंनी पवारांची जन्मतारीख १२ डिसेंबर हीच आपली जन्मतारीख म्हणून जाहीर करून टाकली. आता मुंडे हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्या या पवार ऋणातून मुक्त होण्याच्या आगळ्या वेगळ्या पध्दतीबद्दल कसला खुलासाही होऊ शकत नाही.

शरद पवार १९८० साली महाराष्ट्राचेे मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे नुकतेच राजकारणात हातपाय हलवायला लागले होते. ते त्यावेळी जिल्हा परिषदेवर निवडून आलेले होते. त्यामुळे एक दिवस आपणही शरद पवार यांच्या प्रमाणेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे अशा महत्त्वाकांक्षेचे बीज मुंडेंच्या मनात रुजले आणि त्यामुळे त्यांनी १९८० पासून आपली जन्मतारीख १२ डिसेंबर असल्याची घोषणा केली असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. १२ डिसेंबरची तारीख स्वीकारण्याची गोपीना मुुंडे यांची ही युक्ती अजित पवारांनाही स्वतःला माहीत नाही. गोपीनाथरावांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी त्यांना ही गोष्ट सांगितलेली आहे. खरे म्हणजे ज्या काळामध्ये ही घटना घडली असे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचे म्हणणे आहे त्या काळात हे दोघेही फारच लहान असणार आहेत. तेव्हा त्यांना ही गोष्ट कशी कळली हे काही कळत नाही.

गोपीनाथ मुंडे यांना कोणाची जन्मतारीख चोरायचीच असती तर तिच्यासाठी त्यांनी शरद पवार यांची तारीख नक्कीच वापरली नसती. तसा काही प्रकार करायचाच असता तर महात्मा गांधी, पंडित नेहरु यांच्या तारखा त्यांनी चोरल्या असत्या. निदान ते ज्या भारतीय जनता पार्टीत होते त्या पक्षाचे सर्वांना आदर्श वाटणारे अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख त्यांनी चोरली असती. शरद पवार यांचा वाढदिवसुध्दा फार चांगला नाही. त्यांचा जन्म ‘बारा’मतीत झाला आहे आणि जन्मतारीख १२-१२ अशी आहे. तेव्हा गोपीनाथ मुंडे एवढे नक्कीच चतूर होते की बाराच्या भावात जाणारी जन्मतारीख त्यांनी नक्कीच चोरली नसती.

Leave a Comment