बंडखोरीचे पेव


महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकांची गजबज जारी आहे आणि या वर्षीच्या गजबजीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पक्षांमध्ये प्रचंड बंडखोरीचे पीक आले आहे. अलीकडच्या काळात अशा बंडखोरांना खूप जोर आलेला आहे. परंतु या वर्षीची बंडखोरी ही अभूतपूर्वच म्हणावी लागेल. कारण कोणताही पक्ष बंडखोरीपासून दूर नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि मनसेलासुध्दा बंडखोरीला फटका बसलेला आहे. विधान परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाल्यामुळे महानगरपालिकेतही भाजपाचीच सरशी होईल असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे विविध पक्षातल्या नाराज झालेल्या बंडखोर कार्यकर्त्यांचा ओढा भारतीय जनता पार्टीकडेच आहे. भारतीय जनता पार्टीलासुध्दा या दोन निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले असले तरी ग्रामीण भागात आणि महापालिकाच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी त्यांच्याकडे उभे करायला उमेदवारसुध्दा नाहीत. कारण महाराष्ट्राची काही ठराविक क्षेत्रे सोडता भाजपाची संघटनात्मक ताकद सर्वत्र उभी नाही.

त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नेते येईल त्याला पावन करून घेऊन पक्षातल्या कार्यकर्त्यांचा फुगारा वाढवत चालले आहेत. या निमित्ताने पक्ष वाढत आहे. याचा त्यांना आनंद आहे. परंतु पक्षात येणारे कार्यकर्ते चारित्र्याने कसे आहेत. त्यांची भाजपावरची निष्ठा खरोखरच किती टिकणार आहे याचा विचार भाजपा नेते करेनासे झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये आलेले आहेत. पार्टी विथ डिफ्र्रन्स हे आपले वैशिष्ट्य असल्याचे भाजपातर्फे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात हीन चारित्र्याच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेणे, त्यांना पक्षाचे पदाधिकारी करणे एवढेच नव्हे तर निवडणुकीतली उमेदवारी देणे या सर्व बाबतीत भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षामध्ये काहीही डिफरन्स राहिलेला नाही. एखादा कार्यकर्ता आपल्या पक्षात आपल्याला फारसे स्थान मिळत नाही म्हणून किंवा पक्षाचे धोरणे न पटल्यामुळे इतर पक्षात जात असेल तर हे विचारांतर एकवेळ समर्थनीय मानता येईल. भारतात अशा प्रकारची परिवर्तने अनेकदा झालेली आहेत. परंतु ऐन निवडणुकीच्या मोक्यावर एका पक्षाने तिकिट दिले नाही म्हणून रात्रीतून दुसर्‍या पक्षाची दारे ठोठावण्याचा प्रकार नक्कीच समर्थनीय नाही. अशा प्रकारचा पक्ष बदलूपणा विचाराच्या आधारावर होत नसून निव्वळ निवडणुकीतल्या तिकिटासाठी होत आहे. म्हणून तो चिंताजनक आहे.

अशा कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भाजपात, राष्ट्रवादीमधून शिवसेनेत किंवा मनसेतून शिवसेनेत अशा प्रकारचा दलबदलूपणा यावेळी फार मोठ्या प्रमाणावर केला आहे. आपण वर्षानुवर्षे पक्षाची सेवा करतो परंतु निवडणुकीत उमेदवारी देताना मात्र आपल्याला डावलून पक्षात नवीन आलेल्या उपटसुंभ कार्यकर्त्यांना तिकिट दिले जातात हा आपल्यावर अन्याय असतो असा या पक्षबदलू कार्यकर्त्यांचा दावा असतो. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाची विचार करण्याची पध्दती वेगळी असते. एखादा कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये वर्षानुवर्षे टिकून राहिला आहे. हाच उमेदवारीचा केवळ निकष नसतो. नव्याने पक्षात आलेला कार्यकर्ता मुळात उमेदवारीची अट घालूनच आलेला असतो आणि त्याची निवडून येण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे प्रदीर्घ काळ पक्षात टिकून राहून दाखवलेल्या निष्ठेपेक्षाही निवडून येण्याच्या क्षमतेला अधिक महत्त्व दिले जाते. म्हणूनच आपण निवडून येऊ शकतो याची खात्री देऊन असे कार्यकर्ते नव्या पक्षात शिरकाव करत असतात आणि पक्षांनाही अशा कार्यकर्त्यांनाच महत्त्व द्यावे लागते.

अशावेळी तथाकथित पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा जो आक्रोश होतो. तो मात्र समजून घ्यावा लागतो. मात्र अशा कार्यकर्त्यांना समज दिली जाते. पक्ष जो निर्णय करेल तो मान्य केला पाहिजे हीच खरी पक्षनिष्ठा होय असे त्यांन बजावले जाते आणि काही निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असूनही पक्ष सांगेल ते करण्यास आपण तयार आहोत असे म्हणून पक्षासाठी काम करत राहतात. अर्थात असे असले तरी काही कार्यकर्त्यांना पक्षाचा आदेश किंवा पक्षाचा निर्णय या संकल्पनाच मान्य नसतात. कारण शेवटी पक्ष म्हणजे तरी कोण असा त्यांचा प्रश्‍न असतो. एखाद्या पक्षामध्ये पक्षांतर्गत लोकशाही फार पाळली जात असेल आणि निव्वळ पक्षाच्या हिताचाच विचार करून निर्णय घेतले जात असतील तर अशा पक्षाचे निर्णय मानलेही पाहिजेत. परंतु अशा पक्षांमध्ये निर्णय घेणार्‍या पदाधिकार्‍यांनी स्वतःला निवडणुकीपासून दूर ठेवले पाहिजे. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर पक्ष चालवत असतात आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेले निर्णय अशा बंडखोरांवर पक्षाचे निर्णय म्हणून लादत असतात. याच बहाण्याखाली ते आपल्या नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना भरपूर तिकिटे मिळवून देतात. अशा स्वार्थी लोकांचे आदेश निष्ठावंत कार्यकर्त्यांनी धुडकावून लावले तर त्या कार्यकर्त्यांनी चूक केली असे कसे म्हणता येईल?

Leave a Comment