जगातले सुंदर गांव झालीपई


जगात अनेक सुंदर गांवे निसर्गाचा वरदहस्त असल्याने सुंदर असतात पण दुसर्‍या महायुद्धाच्या खाईत होरपळूनही त्या वेदना विसरणारे व आपले गांव आपल्याच कलाकारीने सुंदर बनविणारे पोलंडमधील झालिपई हे गांव पर्यटकांचे आकर्षण बनल्यास नवल ते काय? पोलंडमधील या सर्वात सुंदर गावात घराघरांवरच नाही तर सर्व स्थिर वस्तूंवर म्हणजे पाण्याच्या टाक्या, पूल, विहीरी, कचरा पेट्या, अगदी कुत्र्याची छोटी घरेही फुलपानांच्या डिझाईन्सनी रंगविली गेली आहेत व यामुळे हे गांव म्हणजे एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे ताजेतवाने वाटते.


घरांवर फुलकारी करण्याची ही परंपरा १०० हून अधिक वर्षे सुरू असल्याचे समजते. म्हणजे त्याकाळी घरे हवेशीर नसत व स्वयंपाकाचे काम धूर सोडणार्‍या स्टेाव्हवर केले जात असे. त्यामुळे घराच्या भिंती काळ्या होत. हे काळे डाग लपविण्यासाठी फेलिशिया कर्व्हीलोव्हा या महिलेने त्या डागांवर सुंदर रंगीत फु ले चितारली. तिची ही कल्पना अन्य महिलांनाही आवडली व त्यांनीही आपापली घरे या पद्धतीने फुलापानांनी चितारायला सुरवात केली. कालांतराने ही पेटींग्ज हीच गावाची ओळख बनली. आज फेलिशियाचे घर म्युझियम म्हणून जतन केले गेले आहे.

दुसर्‍या महायुद्धात या गावाची चांगलीच होरपळ झाली पण त्या वेदनांचा विसर पडावा म्हणून १९४८ पासून येथे सर्वात सुंदर कलाकारी असलेले घर अशी स्पर्धा सुरू झाली व त्यासाठी बक्षीस दिले जाऊ लागले. आजकाल स्वयंपाकघरात धूर होण्याचे कारण राहिलेले नाही त्यामुळे भिंती काळ्या होण्याचाही प्रश्न येत नसला तरी आजही या गावातील महिला दरवर्षी आपली घरे सुंदर कलाकारीने पेंट करतात. सुरवातीला त्यासाठी गाईच्या केसांपासून बनविलेले ब्रश वापरले जात आता आधुनिक ब्रश वापरले जातात.

Leave a Comment