व्हिलचेअरवर बसल्यामुळे कार चालवू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी वरदान ठरणारी एक यंत्रणा केरळच्या अभियंत्याने विकसित केली आहे. विशेष म्हणजे हा अभियंता स्वतः व्हिलचेअरला खिळलेला आहे.
व्हिलचेअरवर बसणारेही आता चालवू शकतील कार!
बिजू वर्गीस असे या ४४ वर्षीय अभियंत्याचे नाव आहे. केरळ सरकार आयोजित करत असलेल्या ‘व्यापार २०१७’ या प्रदर्शनात त्यांची यंत्रणा प्रदर्शित करण्यात आली आहे. कोणत्याही कारच्या ब्रेकवर एक यंत्रणा बसवून त्याद्वारे हातानेच ब्रेक, क्लच आणि ॲक्सिलेटर वापरणे बिजू यांनी बनविलेल्या प्रणालीद्वारे शक्य होते. ही प्रणाली २००३ साली विकसित करण्यात आली असून ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने ती विकसित केली आहे. ती केवळ १५ मिनिटांत बसवता येते आणि त्यासाठी कारमध्ये कोणतेही फेरफार करावे लागत नाहीत, असे ‘व्यापार २०१७’च्या आयोजकांनी सांगितले.
एखाद्या व्यक्तीच्या विकलांगतेच्या प्रमाणानुसार या प्रणालीसाठी १५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. मात्र गरजू व्यक्तींनी ती बिजू मोफत बसवून देतात.
“मी २००० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना व त्याद्वारे त्यांच्या कुटुंबियांना नवजीवन दिले आहे, याचा मला अभिमान आहे,” असे बिजू यांनी मलयाळम मनोरमा या वृत्तपत्राला सांगितले.