नवरानवरी मॅरेथॉन पळाले, वर्‍हाडी घामाघूम


लग्न म्हटले की वरात, घोडी, कार, बँड, दागदागिन्यांनी लगडलेले व नव्या कपड्यांत नटलेले वर्‍हाडी हवेत. पण अनेकांना लग्नासारखा हा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी कांही वेगळा फंडा वापरून लग्नविधी करायला आवडतात. सातार्‍यात दोन दिवसांपूर्वी असाच एक आगळा विवाह पार पडला. त्यामागचा उद्देश स्वास्थसंदेश देण्याबरोबरच लग्नात केले जाणारे अनावश्यक खर्च टाळले जावेत हा मेसेज देण्यासाठीही होता. फिटनेसबाबत जागरूक असणार्‍या नवनाथ दिघे आणि पूनम चिकणे या जोडीने त्यांचा आगळावेगळा विवाहसोहळा नुकताच साजरा केला.

नागनाथ व पूनम हे दोघेही मॅरेथॉन रनर आहेत. त्यामुळे त्यांनी आपले लग्न मॅरेथॉन पळतानाच साजरे करण्याचे ठरविले. त्यांच्यासोबत ५० हून अधिक वर्हामडीही या सोहळ्यात सामील झाले. सातारा जिल्ह्यातील मेढा येथून मॅरेथॉनची सुरवात केली गेली व २५ किमी अंतरावरील विवाह नोंदणी कार्यालयात ती संपली. वर व वर्‍हाडी शॉर्ट पँट व टीशर्ट मध्ये तर वधू स्पोर्टस पँट व टीशर्ट मध्ये होते. डोक्यावर दोघांनीही पारंपारिक लाल रंगाचे फेटे बांधले होते. या दोघांची ओळख तीन वर्षापूर्वी मॅरेथॉन पळतानाच झाली होती. पूनम शिकविण्या घेते तर नागनाथचा प्रिटर्सचा व्यवसाय आहे.त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना त्यांनी हा सोहळा मॅरेथॉनशी निगडीत करण्याचे ठरविले व मित्रमंडळींकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.

या लग्न मॅरेथॉन मार्गावरील छोट्या छोट्या गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी या वधूवराचे जोरदार स्वागत केले. त्यांना हार घातले, ओवाळले व त्यांच्यासोबत कांही काळ पळण्याचा आनंदही लुटला. या रनिंग वेडींगला नवनाथ सदस्य असलेल्या सातारा मेरेथॉन असोसिएशनने सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला.