कंगनाची गुरूदक्षिणा


कंगना रानौत हिने आपले योग गुरू वीरेन्द्र नारायण सिंग यांना आपला दोन कोटी रुपयांचा फ्लॅट गुरू दक्षिणा म्हणून दिला आहेे. सध्याचा जमाना व्यावसायिकतेचा आहे आणि गुरू ही संकल्पना आता लयाला चालली आहे. व्यावसायिकतेमुळे आपल्याला जो कोणी काही शिक्षण देईल त्याला गुरू म्हणण्याऐवजी शिक्षक म्हणणे पसंत केले जायला लागले आहे. तेव्हा कोणाकडून काही प्रशिक्षण घेतले की, त्याला त्याची फी देऊन मोकळे केले जाते. त्याने ठरवलेली फी अदा केली की, शिष्य त्याच्या ऋणातून मोकळा होतो. पण गुरुचे तसे नसते. गुरू ही संकल्पना शिक्षकापेक्षा व्यापक असते. गुरूचा आपल्या जीवनावर अधिक गाढ प्रभाव असतो. शिक्षक एखादे तंत्र शिकवून मोकळा होतो पण गुरू आपल्या सार्‍या जीवनाला व्यापून राहिलेला असतो.

गुरूमुळे शिष्याच्या सार्‍या जगण्यालाच एक नवी दिशा मिळालेली असते. गुरूने दिलेला एखादा मंत्र शिष्याचे सारे जीवन बदलून टाकत असतो. म्हणून गुरुच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी फी देणे पुरत नाही. गुरुला कितीही दिले तरी ऋणमुक्त होता येत नाही. कंगनाने आपल्या गुरु प्रती फारच आदरभाव प्रकट केला असून अंधेरीत असलेला आपला दोन कोटी रुपयांचा फ्लॅट त्यांना गुरू दक्षिणा म्हणून दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गुरू वीरेन्द्र नारायण सिंह यांनी आपल्या या शिष्येकडे काहीही मागितले नव्हते. कंगनाने चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याच्या आधीच तिची या गुरूशी भेट झालेली होती. ती अजून नवीन असतानाच तिने एकदा या गुरूंना जुहू बीचवर व्यायाम करताना पाहिले आणि त्यांचे ते कौशल्य पाहून सरळ त्यांच्याकडे शिक्षण मिळावे अशी इच्छा व्यक्त केली.

गुरूंनी तिला प्रदीर्घ काळ शिक्षण दिलेले आहे. कंगनाच्या यशात या शिक्षणाचा मोठा वाटा आहे असे तिला वाटते. म्हणून तिने हा टू बेडरूम कीचन फ्लॅट त्यांना दिला आहे. गुरूंनी आपल्या स्वभावानुसार त्या फ्लॅटमध्ये योगाचे क्लासेस काढण्याचे ठरवले असून त्या दृष्टीने त्यात काही बदलही केले आहेत. भरपूर मोठी गॅलरी असलेल्या या सदनिकेत लवकरच योगाचे वर्ग सुरू होतील. आपण चित्रपद सृष्टीतल्या कलाकारांकडे एका वेगळ्याच नजरेने पहात असतो पण या स्वार्थी आणि नकली जीवनातही काही कलाकार आपल्या अंत:करणातली कृतज्ञता बुद्धी आणि संस्कार जतन करून ठेवत असतात. अशा कलाकारांच्या यादीत आता कंगनाचे नाव दाखल करायला हरकत नाही.

Leave a Comment