तामिळनाडूत नवे युग


तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललिताच्या मैत्रीण असलेल्या व्ही. के. शशिकला यांचा उद्या शपथविधी होत आहे. या शपथविधीने तामिळनाडूच्या राजकारणात एक नवे पर्व साकार होत आहे. जयललिता यांच्या निधनाने आणि एम. करूणानिधी यांनी वयोमान परत्वे सक्रीय राजकारणातून घेतलेल्या निवृत्तीमुळे गेल्या ३० वर्षांतले राजकारणातले एक पर्व मागे सरले आहे. व्ही. के. शशिकला या अण्णा द्रमुकच्या नेत्या आहेत आणि द्रमुकचे नेते म्हणून एम. के. स्टॅलिन यांचा अनधिकृत का होईना पण राज्याभिषेक झालेला आहे. करूणानिधी यांच्या कुटुंबातील सत्ता संघर्षात स्टॅलिन यांची सरशी झाल्यामुळे द्रमुकचे नेतृत्व यापुढे स्टॅलिन यांच्याकडे असणार आहे आणि जयललितांच्या निधनामुळे अण्णा द्रमु कचे नेतृत्व व्ही. के. शशिकला यांच्याकडे आले आहे. शशिकला या राजकीय कार्यकर्त्या नव्हेत. त्यांची गेल्या २५ वर्षांपासून जयललिता यांच्याशी जी मैत्री होती ती मैत्री हेच त्यांचे राजकीय भांडवल ठरले आहे. त्यामुळे त्या राज्याच्या मुख्यमंत्री होत आहेत.

तसा विचार केला तर जयललिता यांचाही शशिकला यांच्याशी सातत्यपूर्ण संबंध नव्हता. मध्यंतरीच्या काळात या दोघींच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता. शशिकला या अतीशय सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या असून त्या एक व्हीडिओ शॉप चालवत होत्या. तामिळनाडूतल्या एका आयएस अधिकार्‍याने त्यांना पीआरओ म्हणून नोकरीस ठेवून घेतले आणि तिथून त्यांचा उत्कर्ष होण्यास सुरूवात झाली. रूढ अर्थाने ज्याला राजकीय कार्य असे म्हटले जाते तसे कार्य त्यांच्या नावावर कोठेही जमा नाही. किंबहुना आज सगळ्याच पक्षांमध्ये ही स्थिती निर्माण झालेली आहे. राजकारणातली एक पिढी सामान्य जनतेचे लहानलहान कामे करत आणि प्रशासनाचा अनुभव घेत घेत राजकारणातल्या एकेक पायर्‍या वर चढत गेली. परंतु आता राजकारणात जी पिढी येत आहे ती केवळ प्रसिध्दीच्या जोरावर पुढे आलेली आहे. तिने पैशाच्या जोरावर प्रसिध्दी मिळवलेली आहे. राजकीय नेत्यांच्या आसपास घोटाळून त्यांनी डावपेचाचे शिक्षण हस्तगत केलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवून ते नेतृत्व करायला लागले आहेत. शशिकला हे अशाच नेत्यांचे एक उदाहरण आहे. आपण विविध राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे पहायला गेलो तर अशीच नेतेमंडळी आपल्याला दिसतात. त्यांनी सत्ता हस्तगत करण्याचे एक तंत्र विकसित केले आहे आणि सत्ता टिकवण्याचेसुध्दा काही मंत्र अवगत केले आहेत.

अशा नेत्यांचा जमाना आता सुरू झालेला आहे. शशिकला यांच्याबाबतीत काही विशिष्ट गोष्टी घडत गेल्या. त्यांनी ग्रामपंचायतीचीसुध्दा निवडणूक कधी लढवलेली नाही. अगदी पंचायत समितीसारख्या खालच्या स्तरावरील यंत्रणेच्या प्रशासनाचा काडीचाही अनुभव त्यांच्या खाती जमा नाही. त्या आज मुख्यमंत्री होत असल्या तरी त्यांनी आमदार म्हणूनसुध्दा कधी काम पाहिलेले नाही. त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा अजिबात अनुभव नाही. मात्र तामिळनाडूतल्या राजकारणाच्या एका विशिष्ट शैलीमुळे त्यांना थेट मुख्यमंत्रीपदाचा लाभ होत आहे. जयललिता यांनी आपल्या हयातीत जे निर्णय घेतले, जी राजनीती राबवली ती सारी शशिकला यांनी जवळून पाहिली आहे. त्यांचे ते निरीक्षण आणि नकळतपणे झालेले शिक्षण यामुळे त्यांच्या ज्या काही क्षमता विकसित झाल्या असतील त्यांचाच केवळ त्यांना मुख्यमंत्रीपद राबवण्यासाठी उपयोग होणार आहे. नेतृत्वाच्या तळागाळापासून वाटचाल केली नसली तरी बुध्दिमत्तेच्या जोरावर जर त्यांनी मुख्यमंत्रीपद नीट राबवले तर त्या कदाचित त्याही पदावर यशस्वी होऊ शकतील. परंतु या जरतरच्या गोष्टी आहेत.

व्ही. के. शशिकला यांच्यामुळे जयललिता यांच्यावर अनेक वाईट प्रसंग गुदरलेले होते. जयललिता मुख्यमंत्री झाल्यानंततर त्यांच्यावर पहिल्यांदा जी व्यापक टीका झाली ती त्यांच्या मानसपुत्राच्या लग्नाच्या संबंधातच झाली. हा मानसपुत्र म्हणजे शशिकला यांचा पुतण्या होता. नंतरच्या काळात जयललिता यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांचेही श्रेय बर्‍याच प्रमाणात शशिकला यांच्याकडे जाते. त्यामुळे आता शशिकला यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारण्यास तयारी दाखवली असली तरी जयललिता यांच्या प्रमाणेच शशिकला यांच्याही डोक्यावर भ्रष्टाचाराच्या संबंधातील खटल्यांची टांगती तलवार आहेच. त्यामुळे ती तलवार त्यांना सुखाने झोप घेऊ देणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अण्णा द्रमुक पक्षामध्ये पक्षप्रमुखपद आणि मुख्यमंत्रीपद अशी दोन सत्ता केंद्रे राहू नयेत म्हणून त्यांना अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळण्याचा आग्रह केलेला आहे. असे असले तरी पक्षातला एक गट त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विरोधात आहे. त्याचाही त्यांना त्रास होणार आहेच. मात्र अण्णा द्रमुक पक्षात थंबीदुराई आणि ओ. पनिरसेल्वम् या दोघांची गटबाजी होती. ती गटबाजी मिटवण्यास शशिकलांचे सत्ताग्रहण उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment