एअरटेल विरुद्ध जिओची एकमेकांविरोधात तक्रार


नवी दिल्ली – जिओने मोफत सेवा देऊन बाजारातील स्पर्धाच नष्ट करुन टाकली अशा आशयाची तक्रार भारती एअरटेलने भारत सरकारच्या स्पर्धा आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे वृत्त फायनांशियल एक्सप्रेसने दिले असून रिलायन्स जिओ विरुद्ध इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये या तक्रारीमुळे सध्या सुरू असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याआधी स्पर्धा आयोगाकडे जिओने देखील व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलविरोधात तक्रार दाखल केली होती. जिओला व्होडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेल या कंपन्या इंटरकनेक्शन नाकारत आहेत, जिओच्या कॉलला खराब व्हॉइस क्वालिटी दिली जात आहे, अशी तक्रार जिओने स्पर्धा आयोगाकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती.

व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेल या कंपन्या बाजारात असलेले आपले वजन वापरुन जिओच्या कनेक्शनला मुद्दामहून खराब सेवा पुरवत आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे या तक्रारीमध्ये म्हटले होते. या कंपन्यांनी एखाद्या टोळीप्रमाणे कार्य करत असून जिओला व्यवसाय करू देत नसल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते. जिओच्या तक्रारीच्या प्रत्युत्तरात एअरटेलनेही तक्रार दाखल करुन रिलायन्सने मोफत सेवा देऊन बाजाराची रचना मोडल्याचा आरोप केला आहे.

या कंपन्यांविरोधात रिलायन्सने नोव्हेंबर महिन्यात तक्रार दाखल केली होती तर एअरटेलने २ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली आहे. स्पर्धा आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश दिले आहेत. बाजारातील स्पर्धेचे वातावरण नष्ट केल्याचा आरोप जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्या एकमेकांवर करत आहेत. जिओने नियमांचा भंग केल्या प्रकरणी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) यांच्याकडे एअरटेल आणि आयडियाने तक्रार दाखल केली होती. याबाबत ट्रायने बघ्याची भूमिका घेतली असल्यामुळे टेलिकॉम कंपन्या नाराज आहेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तक्रारीवर आज सुनावणी होणार आहे.

Leave a Comment