कॉंग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रातली निवडणूक प्रचाराची सुरूवात करण्यासाठी आखलेल्या जाहीर सभेच्या आधी सोन्याच्या ताटात शाही जेवणाचा बेत पार पाडल्याचे वृत्त चांगलाच चर्चेचा विषय झाले आहे. खरे तर हे जेवण सोन्याचच्या ताटात नव्हते. याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांवर अन्याय होत आहे. ही ताटे पंचधातूची होती आणि त्यांंना सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात नांदेडचा एक भोजन कंत्राटदार असे थाटामाटात जेवण देण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. अनेक थोरामोठ्यांच्या घरातल्या विवाह समारंभात त्याला आवर्जुन काम दिले जाते आणि हा कंत्राटदार फार छान आयोजन करतोे. येणेगूर या गावात हा प्रकार घडला. आपल्या घरी कॉंग्रेसचे मोठे मोठे नेते येणार असे कळताच या भागातल्या एका कॉंग्रेस नेत्याला या कंत्राटदाराची आठवण झाली.
सोनियाच्या ताटी……..
नांदेडहून त्याला पाचारण करण्यात आल्यावर त्याने आपल्या खासियतीला जागून हा सारा जामानिमा केला. नेत्यांना आपल्याला असा सुवर्णयोग आहे असे आधी कळले असते तर त्यांनी नक्कीच असा थाटमाट करू दिला नसता. कॉंग्रेस नेत्यांनी स्वत:च अशा भोजनाची व्यवस्था केली असती तर नक्कीच ही सोनेरी ताटे आणि शाही जेवण आयोजित केलेच नसते. आता आपली व्यवस्था होत आहे आणि तिथे गेले पाहिजे म्हणून ते गेले. तिथे गेल्यावर ही ताटे समोर दिसताच त्यांनाही काही तरी चुकत आहे अशी जाणीव झालीच असणार पण अशी सोनेरी ताटे आली म्हणून ऐनवेळी जेवण नाकारताही आले नसेल. मुळात असा प्रकार का होतो ? कॉंग्रेस पक्षातला साधेपणाचा संस्कार वरपासून खालपर्यंत नीट झिरपला नाही म्हणून असा प्रकार होतो. मुळात असा संस्कार झिरपला असता तर कसली सूचनाही करावी लागली नसती. आपोआपच साधा बेत झाला असता.
तसा मुळात कोणी कशाच्या ताटात जेवावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. यातले प्रत्येक नेते आपापल्या घरात सोनेरी मुलामाच काय सोन्याच्या ताटातही जेवत असतील तर त्यांना कोणी हरकत घेणार नाही पण सार्वजनिक कार्यक्रमात आणि त्यातल्या त्यात निवडणुकीच्या प्रचारात तरी असे करायला नको होते. विशेष म्हणजे कॉंग्रेसच्या हाती सत्ता आली असताना त्यांनी सामान्य माणसाची सोन्याच्या ताटात जेवण करण्याइतकी ऐपत तयार केली असती तरीही या कार्यक्रमातल्या सोन्याच्या ताटांचे कोणालाच वाईट वाटले नसते. पण यांच्या कर्तबगारीने जनता भिकेला लागली आहे आणि हे मात्र असा देखावा करीत आहेत हे ठीक वाटत नाही.
त्यांचे नेते राहुल गांधी तर गरीब लोकांच्या घरी त्यांच्याच ताटात जेवण करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे सोनेरी जेवण नक्कीच खटकणारे आहे. अशोक चव्हाण आदि नेत्यांना आपण सोन्याच्या मुलाम्याच्या ताटात जेवलो यात काही चूक केली असे वाटत नसेल तर मग राहुल गांधी यांच्या गरिबांच्या ताटात जेवण्याला काही अर्थ नाही असे म्हणावे लागेल. आता चव्हाणांनी खुलासा करायला सुरूवात केली आहे पण या खुलाशात काही दम नाही कारण चकाकणारी ताटे आणि त्यातले खाद्यपदार्थ सारे काही व्हायरल झाले आहे. अशोक चव्हाण यांचा खुलासा मानला तरीही या जेवणात साधेपणाचा आदर्श उभा करण्यात आला नव्हता एवढे तरी नक्कीच.