जगातील सर्वात पुराणी इमोजी शोधल्याचा दावा


वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जुनी इमोजी शोधल्याचा दावा केला असून १६३५ सालच्या कायदेशीर कागदपत्रात ही इमोजी सापडली आहे. स्लोवाकियातील नगरपालिका अकौंट कागदपत्रातील एका दस्तावेजामध्ये वकीलाने त्याच्या सहीसोबत एक हसरा चेहरा बनविल्याचे दिसून आले आहे. स्ट्रोजोव माउंटन जवळील एका गावाच्या नगरपालिकेत ही इमोजी असलेला कागद सापडल्यानंतर तो प्रसिद्ध केला गेला आहे.

या कागदपत्रात वकीलाने कागदपत्र तपासल्याची सही करताना एक वर्तुळ रेखाटून त्यात दोन डॉट व खाली छोटीशी रेघ मारली आहे. आजच्या हसर्‍या इमोजीप्रमाणेच ती दिसते आहे. हे ड्राॅइंग जगातील सर्वात जुनी इमोजी असल्याचे न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात नमूद केले गेले आहे. स्लेाव्हाकियाच्या नॅशनल अकाईव्हजचे प्रमुख पीटर ब्रांझा म्हणतात, ही जगातील सर्वात जुनी इमोजी आहे वा नाही हे मी सांगू शकत नाही पण ट्रेंचीन शहरातील ही नक्कीच सर्वात जुनी इमोजी आहे.

इंग्लंडमधील रॉबर्ट हेरिक यांनी १६४८ ला रेखाटलेला हसरा चेहरा सर्वात जुनी इमोजी मानला गेला होता. टू फॉर्च्यून या कवितेत हा चेहरा आढळला होता मात्र नवी इमोजी याहीपेक्षा १३ वर्षे अगोदरची आहे. संबंधित वकीलाला हिशोब कागदपत्रांत कांहीही गडबड न आढळल्याने त्याने हा हसरा चेहरा काढला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment