मुंबई – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी दुसरी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने रोख व्यवहारांसाठी बचत खातेधारकांवर आकारण्यात येणार्या शुल्कात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर रोकड रहित आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे बँकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
एचडीएफसीकडून रोख व्यवहारांवरील शुल्कात वाढ
बँकेच्या एका अधिकार्याने सांगितले की, एफडीएफसी बँकेने 1 मार्चपासून काही व्यवहारांवर आकारण्यात येणार्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही व्यवहारांवर रोखीची मर्यादा आणि काही अन्य ट्रांजॅक्शनवर नव्याने शुल्क आकारण्यात येणार आहे. बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, थर्ड पार्टी सोबत दर दिवशी 25,000 रुपयेपर्यंत व्यवहार करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच शाखांमध्ये करण्यात येणार्या फ्री व्यवहारांची संख्या पाचवरून चार करण्यात आली असून नॉन-फ्री ट्राजॅक्शनची शुल्क 50 रुपयांवरून वाढवून 150 रुपये करण्यात आली आहे.
हे नवीन नियम फक्त सॅलरी आणि बचत खातेदारकांना लागू असणार आहेत. तसेच बँकेने होम ब्रांचेजमध्येही फ्री कॅश ट्रांजॅक्शन दोन लाखापर्यंत मर्यादित केले आहे. यावरील जास्त व्यवहारांना जास्तीत जास्त 150 रुपये किंवा पाच रुपये प्रती हजार रुपये भरावे लागणार आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या शाखांमध्ये चारपेक्षा जास्त कॅश व्यवहारांवर कमीतकमी 150 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अॅक्सीस बँकेनेही एक लाख रुपयांपेक्षा जास्त प्रति महिना रोख रक्कम जमा केल्यास 150 रुपये किंवा प्रति हजार 5 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.