अन्न हेच औषध


आपण सध्या विविध प्रकारच्या विकारांनी ग्रस्त होऊन रोज एवढ्या गोळ्या घ्यायला लागलो आहोत की आपला सकाळचा ब्रेकफास्ट गोळ्यांचाच होत आहे. आपण अन्नासारखे औषधे खात आहोत परंतु ही औषधे टाळून नियोजनपूर्वक काही अन्न नीट खाल्ले तर ते अन्नच आपल्याल औषधासारखे उपयोगी पडू शकते. तेव्हा काही अन्नांचे किंवा पदार्थांचे औषधी गुणधर्म जाणून घेतले पाहिजेत. आपण दररोज खातो ती हळद अनेक औषधी गुणांनी युक्त असते. हळदीमध्ये सर्क्युमीन नावाचे औषधी द्रव्य आहे. ज्याच्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे हळदीचे कसलेही साईडइफेक्ट नाहीत. आपण दुधात घालून हळद प्राशन केली तर ती वेदनाशामक ठरते. शिवाय खवखवणारा घसा मोकळा होतो आणि त्वचा नितळ होते. विशेषतः सांध्यांच्या दुखण्यावर हळद उपयोगी पडते.

अद्रक किंवा आले याचे तर औषधी गुणधर्म अनेक प्रकारचे आहेत. सांध्यांचे दुखणे, पोट दुखणे, छाती दुखणे, शरीरातल्या कोणत्याही स्नायूंचे सुजणे आणि महिलांच्या मासिक पाळीतील वेदना यांच्यावर आल्याचा उतारा चांगला असतो. शरीराचा जो भाग दुखत असेल त्या भागावर आले ठेचून बांधावेत. चेरीची फळे हीसुध्दा औषधी असतात. रेज व्हॅरॅट्रोल या नावाच्या लाल द्रव्यामुळे चेरीला लाल रंग आलेला असतो. चेरीचा फळांमुळे सांध्यांचे आणि पाठीचे दुखणे थांबते. जेव्हा पाठ दुखत असेल तेव्हा मूठभर चेरी खावी. मीठ हे कितीतरी सामान्य अन्नद्रव्य आहे. परंतु ते अनेक प्रकारे औषधी गुणधर्म दाखवते. त्याचे कसकसे उपयोग करावेत यावर अनेक ठिकाणी माहिती दिली जाते परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये १० ते १५ चमचे मीठ घालून त्याने स्नान केल्यास शरीराच्या वेदना कमी होतात.

सोयाबीन सर्वाधिक औषधी गुणधर्म असलेले धान्य होय. सांध्यांच्या वेदना आणि हाडांचे दुखणे यावर सोयाबीनमधील आयसोफ्लेवन्स हे द्रव्य गुणकारी ठरते. त्याचबरोबर आपण रोज पितो तीच कॉफी जर वेदनाशामक म्हणून वेदना होत असताना जाणीवपूर्वक प्राशन केली तर तिचाही उपयोग वेदनाशामक म्हणून होतो. तेव्हा डोके दुखायला लागले किंवा अंग दुखायला लागले की डॉक्टरला न विचारता उगाच क्रोसीन, सारिडॉनसारख्या गोळ्या घेत बसण्यापेक्षा ही घरात उपलब्ध असलेली अन्नद्रव्येच व्यवस्थित वापरावीत. त्यांचा चांगला उपयोग होतो. क्रोसीन सारख्या गोळ्यांचे दुष्परिणाम होत असतात. ते या घरगुती उपायांनी टळतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही