कैलास मानसरोवर यात्रा नोंदणी सुरू


परराष्ट्र मंत्रालयाने पवित्र कैलास मान सरोवर यात्रेसाठीची नोंदणी १ फेब्रुवारीपासून सुरू केली असून ती १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा ही यात्रा १२ जून ते ८ सप्टेंबर अशा काळात आहे. या यात्रेसाठी १ जानेवारी २०१७ ला १८ वर्षे पूर्ण असलेले व ७० वर्षांपेक्षा कमी वयाचे भाविक नांव नोंदवू शकणार आहेत. या यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुविधाही सुरू केली गेली आहे.

यंदा दोन मार्गांनी ही यात्रा करता येणार आहे. उत्तराखंडच्या लिपुलेख दरीतून पारंपारिक मार्गाने भाविक जाऊ शकतील. हा मार्ग खडतर आहे. या मार्गावरून जाण्यासाठी यात्रेकरूंना प्रत्येकी १लाख ६० हजार रूपये खर्च येईल. या मार्गाने १८ जथ्थे सोडले जाणार असून प्रत्येक जथ्यात ६० यात्रेकरू असतील. या यात्रेचा कालावधी २४ दिवसांचा आहे.

दुसरा मार्ग सिक्कीमच्या नथुला खिंडीतून असून हा वाहनमार्ग आहे. वयोवृद्ध यात्रेकरूंसाठी हा मार्ग सोपा असून त्यांना त्यासाठी प्रत्येकी २ लाख रूपये खर्च येईल. या यात्रेचा कालावधी २१ दिवसांचा आहे. ही यात्रा हिंदू भाविकांसाठी धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाची मानली जाते. कैलास हे महादेवाचे निवासस्थान मानले जाते. जैन व बौद्ध भाविकांसाठीही ही यात्रा पवित्र मानली जाते.

Leave a Comment