अर्थसंकल्पाबाबत संघपरिवारातील संघटना नाराज


तरतुदींचा पुनर्विचार न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ नाराज असून अर्थसंकल्पाबाबत फेरविचार करण्याची संघटनेची मागणी आहे. या मागणीचा विचार ना झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात गरीब आणि कष्टकऱ्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

अर्थसंकल्प सादर करताना असंघटीत क्षेत्रातील कामगार, सरकारी योजनांतर्गत काम करणारे कष्टकरी यांच्या मोबदल्यात वाढ, त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे या बाबींकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका संघटनेचे महासचिव वृजेश उपाध्याय यांनी केली आहे. जेटली यांनी जाहीर केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याची क्षमता या अर्थसंकल्पात नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

नोटाबंदीच्या निर्णयाने सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला आहे. मात्र त्याचा विनियोग सामाजिक कामांसाठी केला जात असल्याचे दिसून येत नाही; अशी टीका करून उपाध्याय यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात शहरे सोडून; आपल्या कामधंद्यावर, रोजगारावर पाणी सोडून पुन्हा आपल्या गावाकडे परतावे लागले आहे. अशा प्रकारे नोटाबंदीचा फटका बसलेल्या श्रमिकांना नुकसानभरपाई मिळावी; अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Comment