मारन बंधू निर्दोष


तामिळनाडूतले द्रमुक आणि अद्रमुकचे नेते भ्रष्टाचाराच्या बाबतीत फार बदनाम झालेले आहेत. अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता या तर जेेलयात्रा करून आल्या. त्यांच्यावर अनेक खटले होते आणि त्यांचे निकाल त्यांच्यासाठी फारच क्लेषदायक ठरले असते पण त्यांची मरणाने सुटका केली. द्रमुकचे नेते ए. राजा यांचा २ जी स्पेक्ट्रम घोटाळा तर सार्‍या जगात गाजला आहे आणि त्यातली अपहाराची रक्कम डोळे फिरवणारी आहे. पक्षाचे सर्वेसर्वा करुणानिधी यांची कन्या कनिमोझी हिलाही भ्रष्टाचाराच्या संबंधात एक वर्षाची कोठडीची हवा खायला लागली आहे आणि अजूनही तिची या खटल्यातून मुक्तता झालेली नाही. द्रमुकच्या याच भ्रष्टाचाराच्या मालिकेत मारन बंधूही अडकले होते. कलानिधी आणि दयानिधी मारन या दोन बंधूंवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप होता पण त्यातून ते सुटले आहेत.

मारन हे करुणानिधी यांच्या बहिणीची नातवंडे. दयानिधी मारन हे केन्द्रात टेलिकॉम मंत्री होते. करुणानिधी हे हातात सत्ता आल्यावर अन्य कोणाला तिच्यात वाटेकरी करून घेत नाहीत. सारी पदे आपल्याच कुटुंबात वाटून घेतात पण जेव्हा केन्द्र सरकारमधील काही पदे त्यांच्या आवाक्यात येतात तेव्हा त्यांना मारन किंवा ए राजा अशा कोणाची तरी मदत घ्यावी लागते. कारण करुणानिधी यांच्या कुटुंबात दिल्लीतले राजकारण करण्याइतपत चांगले इंग्रजी कोणाला बोलता येत नाही. त्यांच्या या अडचणीमुळेच त्यांना मारन कुटुंबाचा आधार घ्यावा लागला. केन्द्रात कॉंग्रेसच्या सरकारमध्ये द्रमुकचा वाटा होता. त्यातले दूरसंचार खाते पक्षाला मिळाले तेव्हा या पदासाठी त्यांनी दयानिधी मारन यांची निवड केली.

दयानिधी मारन यांनी आपल्या या पदाचा वापर करूऩ काही कंपन्यांच्या विक्रीत रस घेतला. आपल्या पदाचा दबाव वापरून एका कंपनीची विक्री आपले हितसंबंध असलेल्या कंपनीला स्वस्तात करायला भाग पाडले. त्यामुळे त्यांच्यावर या संबंधात काही आरोप होताच त्यांनी आपले पद सोडले आणि चौकशी सुरू झाली. त्यांच्या विरोधातला खटला २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचे खटले चालवणार्‍या विशेष न्यायालयात चालले आणि आता तूर्तास तरी या न्यायालयाने मारन बंधू आणि त्यांच्या कंपन्यांना या प्रकरणात निर्दोष सोडले आहे. अर्थात या निकालाने त्यांना दिलासा मिळाला असला तरी तो तात्पुरता आहे कारण विशेष न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात सरकार उच्च न्यायालयात जाणारच आहे. एक कोर्टबाजीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि प्रारंभ मारन बंधूंना अनुकूल असा झाला आहे.

Leave a Comment