या सरस्वती मंदिरात कालीदासाने केली होती उपासना


आज वसंतपंचमी. वसंतपंचमीला सरस्वती पूजनाची प्रथा भारतवर्षात आहे. सरस्वती ही ज्ञानाची देवी मानली जाते. वसंत पंचमीला सरस्वतीचे पूजन विशेष फलदायी मानले जाते. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील बारसोई भागातील बेलवा गावात प्राचीन सरस्वती मंदिर असून येथे वर्षभर सरस्वतीची उपासना केली जाते. विशेष म्हणजे महाकवी कालिदासाने याच मंदिरात सरस्वतीची उपासना केली होती असेही सांगितले जाते. या देवीवर ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे.

या मंदिरात सरस्वती महाकाली, महागौरी व महासरस्वती अशा तिन्ही रूपांत असून तिला नील सरस्वती म्हटले जाते. बेलवापासून ४ किमी वर असलेल्या वाडी हुसैनपूर येथे हे प्राचीन मंदिर आहे. ही सरस्वती ज्ञान व समृद्धीचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याची भाविकांची भावना आहे. महकवी कालिदासाचे हे सासर गांव. कालिदास पत्नीच्या ओढीने येथे आला असता त्याच्या पत्नीने त्याची लंपट म्हणून निर्भत्सना केली तेव्हा दुखावलेल्या कालिदासाने या सरस्वती मंदिरात उपासना केली व त्यानंतर एकापेक्षा एक उत्तम अशी महाकाव्ये त्याने रचली असे सांगितले जाते.उज्जैन नगरीत कालिदासाला खरी प्रसिद्धी मिळाली.

या गावात पूर्वीच्या राजघराण्यांचे कांही अवशेष आजही पाहायला मिळतात. पूर्वी या मंदिरात बली देण्याची प्रथा होती मात्र १९९५ पासून ही प्रथा बंद केली गेली आहे. या देवीच्या दर्शनासाठी वसंतपंचमीला मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.

Leave a Comment