बस खरेदीवर मिळणार हेलिकॉप्टर फ्री


ग्राहकांची खरेदीची मानसिकता जाणून असलेल्या उत्पादक कंपन्या त्यांच्या माल विक्रीसाठी नेहमीच वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. एकावर एक फ्री, दोन खरेदी करा- पाच मोफत मिळवा असल्या योजना हा त्याच्याच एक भाग. आजकाल इलेक्ट्राॅनिक्स वस्तू व महागड्या कार्सवरही असे कांही ना कांही फ्री देण्याच्या ऑफर्स दिल्या जातात. फुरियन या कंपनीने त्यांच्या लग्झरी बस खरेदी करणार्‍याला चक्क हेलिकॉप्टर फ्री देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.


फुरियन ही कस्टम डिझाईन कंपनी असून त्यांनी हायटेक ओब्सेनिटी मोटर होम तयार केले आहे. ही लग्झरी बस असून ते चालतेफिरते अत्याधुनिक घरच आहे. या बसच्या टपावर हेलिपॅड असून तेथे दोन सीटर हेलिकॉप्टर लँड करता येते. या लग्झरी बसमध्ये डबल डोर फ्रिज व डिश वॉशरसह सर्व सुविधांनी युक्त किचन, शॉवरसह बाथरूम्स, आरामदायी डबलबेड सह मास्टर बेडरूम, तसेच सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. ही बस खरेदी करणार्‍याला दोन सीटर रॉबिन्सर हेलिकॉप्टर मोफत दिले जाणार आहे. अर्थात बस महाग आहे. म्हणजे फार महाग नाही. तिची किंमत आहे १७ कोटी रूपये. सध्या ही बस कॉन्सेप्ट बेसवर शोकेस केली गेली आहे मात्र लवकरच ती बाजारात आणली जाणार आहे.

Leave a Comment