२०१६ मध्ये रामदेव बाबांच्या ११.४ लाख जाहिराती


नवी दिल्ली – विदेशी कंपन्यांना रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांनी चांगलीच टक्कर दिली असून पतंजली उत्पादनांच्या वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिराती किफायतशीर सिद्ध होत आहेत. पतंजलीने रामदेव बाबांच्या प्रतिमेचा वापर करण्याबरोबरच आपले उत्पादन नैसर्गिक असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे आपल्या जाहिरातींसाठी पतंजलीने वृत्त वाहिन्यांवरच भर दिला आहे. व्यूहरशीप मोजणारी संस्था बार्क इंडियाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये विविध वाहिन्यांवर पतंजलीच्या ११.४ लाख जाहिराती दाखवल्या गेल्या. कंपनीच्या जाहिराती ७,२२१ तास वाहिन्यांवर दिसल्या. याचाच अर्थ दररोज १९ तास ४३ मिनिटे जाहिरातींचे प्रसारण झाले.

याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांच्या वृत्तानुसार पतंजली ही देशातील सर्वात वेगाने वाढणारी एफएमसीजी कंपनी आहे. ५ हजार कोटी रूपये इतका सध्या या कंपनीचा महसूल आहे. या वर्षांच्या अखेरीपर्यंत कंपनीने १० हजार कोटी पर्यंत नेण्याचे उद्धिष्ठ ठेवले आहे. पतंजलीच्या यशामागे त्यांचे आक्रमक जाहिरात धोरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देंत्सु एजिस नेटवर्कचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आशिष भसीन यांच्या मते, पतंजलीची रणनीती आक्रमक आहे. एफएमसीजी हा सोपा व्यवसाय नाही. या उत्पादनांसाठी ब्रँडबरोबरच वितरण व्यवस्थाही मजबूत असावी लागते. पतंजलीची वितरण व्यवस्था अत्यंत चांगली आहे. त्याचे संचालकच सर्वात मोठे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.

विशेष म्हणजे स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत पतंजलीचा जाहिरातीवरील खर्च हा फक्त ८ ते १० टक्के इतका आहे. कंपनीचे प्रवक्ता एस. के. तिजारावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते रामदेव बाबांनी दिलेल्या तीन सिद्धांतावर मार्गक्रमण करतात. जागतिक दर्जाची गुणवत्ता, कमी किमत आणि सर्व फायदा सामाजिक कार्यासाठी हे तीन सिद्धांत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या जाहिरातीत सेलिब्रेटिज घेत नाही. रामदेव बाबा स्वत: ग्राहकांशी बोलतात. आम्ही जाहिराती व विपणनावर फक्त ३०० कोटी रूपये खर्च करतो. पतंजलीने २०१६ मध्ये केलेल्या जाहिरातींपैकी ८४ टक्के जाहिराती या वृत्त वाहिन्यांवर प्रसारित झाल्या आहेत.

Leave a Comment