अवघ्या ५ रुपयांसाठी राबत होता द ग्रेट खली!


नवी दिल्ली – ‘द मॅन हू बिकम्स खली’ या विनित के बन्सल यांच्या सहकार्याने शब्दबद्ध केलेल्या चरित्रातून ‘द ग्रेट खली’ने आपल्या खडतर वाटचालीला या निमित्ताने उजाळा दिला आहे. यात दलीप सिंग राणा उर्फ खलीच्या घरी असायचे ते केवळ अठराविश्वे दारिद्रय़. शाळेची अडीच रुपयांची फी देखील त्याचे पालक भरू शकत नव्हते. गरीबी इतकी त्यांच्या पाचवीला पुजलेली. त्यामुळे खलीला शाळेला रामराम ठोकावा लागला आणि अवघ्या आठव्या वर्षीच तो दिवसाकाठी ५ रुपयांसाठी दिवसभर एका नर्सरीच्या माध्यमातून रोपांची लागवड करत असे.

सदर चरित्रात दलीप सिंग राणा हा ‘द ग्रेट खली’ कसा झाला, या प्रवासाची झलक घेतली गेली आहे. लहान वयात खलीला कष्ट करावे लागले असले तरी धिप्पाड, मजबूत शरीरयष्टी ही त्याला लाभलेली दैवी देणगी होती. तो उमेदीच्या वयात यामुळे हास्यविनोदाचे लक्ष्य ठरत असे. पण, याच दैवी देणगीच्या बळावर त्याने वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकण्यापर्यंत मजल मारली आणि अर्थातच, अवघ्या क्रीडा विश्वाला आपली दखल घ्यायला लावली.

माझ्यावर शालेय स्तरावर माझे मित्र हसत. शिक्षक काय शिकवायचे, हे मला कळत नसे आणि माझे पालक माझी फी देखील देऊ शकत नव्हते. १९७९च्या हंगामात मान्सून अपेक्षेप्रमाणे बरसला नाही. पिके वाळून गेली आणि घरी अगदी एका पैशाची देखील चणचण निर्माण झाली. दुस-या इयत्तेत पोहोचलो आणि तिथे शिक्षक मला रोज फीबद्दल विचारायचे. माझ्याकडे काहीच उत्तर नसायचे. त्यातच एकदा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर माझा पाणउतारा केला आणि त्यावेळी मी शाळेची पायरी उतरलो ते पुन्हा न चढण्यासाठीच. अर्थातच, माझे शिक्षण तिथेच थांबले, असे खली या चरित्रातून म्हणतो.

गावात त्याचवेळी रोपांची लागवड करण्यासाठी कामगार हवे आहेत आणि यासाठी रोज ५ रुपयांचा पगार मिळेल, असे आमच्या ऐकण्यात आले. माझे पालक अडीच रुपयांची फी देऊ शकत नसताना ५ रुपयांचा पगार रोज मिळणे माझ्यासाठी जॅकपॉटच होता. माझे वडील व काम देणारी ती व्यक्ती दोघेही राजी नव्हते. मी केवळ ८ वर्षांचा होतो. पण, माझ्या आग्रहाखातर ते राजी झाले. वन विभागाच्या त्या उपक्रमानुसार, ४ किलोमीटर अंतरावर नर्सरीमध्ये मी कामाला सुरु केली. रोपे गोळा करायची आणि ४ किलोमीटरवर जाऊन ती लावायची. त्यानंतर पुन्हा परत यायचे आणि पुन्हा ती लावायची, असे तीनवेळा करावे लागायचे आणि त्यानंतर दिवसाचे काम पूर्ण व्हायचे. त्या काळी पाच रुपये हातात यायचे, त्यावेळी तो माझ्यासाठी सर्वोच्च क्षण होता. अर्थात, पुढे शिमलात काही रेस्टॉरंटचे मालक असलेल्या उद्योगपतीचा अंगरक्षक म्हणून मी रुजू झालो आणि तेथे मला १५०० रुपये मिळायचे. शिवाय, राहण्या-खाण्याची सोय होती. ती माझी खरी नोकरी’, असे खली यात शेवटी म्हणाला आहे.

Leave a Comment