नाशिक नावाचा संबंध शूर्पणखेशी


महाराष्ट्रात गोदातीरावर वसलेले पवित्र धार्मिक स्थळ म्हणून नाशिक शहर प्रसिद्ध आहे. मात्र या गावाचे नांव नाशिक पडण्याचा संबंध थेट रावणाची बहिण शूर्पणखा हिच्याशी असल्याचे कदाचित आपल्याला माहिती नसेल. राम, लक्ष्मण सीता यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही नगरी. असेही सांगतात की शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले नसते तर सीता हरण झाले नसते, राम रावण युद्ध झाले नसते. शूर्पणखा रावणाची बहिण होती. तिचे नाक कापल्याने चिडलेल्या रावणाने सीताहरण केले व त्यामुळेच राम रावण युद्ध झाले.

राम, लक्ष्मण सीता वनवासात असताना फिरतफिरत येथे आले व भारद्वाज मुनींनी दंडकारण्याचा भाग असलेल्या या क्षेत्रात कुटी बांधून रहा असे रामाला सांगितले. वडाची पाच मोठी झाडे असलेल्या ठिकाणी रामाने झोपडी बांधली. पाच वटवृक्ष म्हणून याला पंचवटी असे नांव पडले. तसेच येथील तपोवनात लक्ष्मणाने शूर्पणखेचे नांक कापले. नाकाला नासिका असाही शब्द आहे त्यावरून या ठिकाणाचे नांव नाशिक असे झाल्याचे सांगितले जाते.


नाशिकात राम लक्ष्मण सीतेची खूप मंदिरे आहेत. गोदावरी स्नानाचे मोठे पुण्य सांगितले जाते. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. सीतागुंफा असे नाव असलेल्या ठिकाणावरून रावणाने सीतेला पळवून नेल्याचा विश्वास आहे. येथील रामकुंडात राम स्नान करत असत व त्यामुळे हे कुंड फार प्रसिद्ध असून भाविक या कुंडात आवर्जून स्नान करतात. येथे अस्थिविसर्जन केल्यास मोक्ष मिळतो असाही विश्वास आहे व महात्मा गांधींच्या अस्थि येथे विसर्जित केल्या गेल्या होत्या.

येथील प्रसिद्ध काळाराम मंदिर पेशव्यांनी बांधले आहे. पंचवटीतील साधूंनी राक्षसांपासून संरक्षण देण्याची विनंती रामाला केल्यावर त्याने काळे रूप धारण करून राक्षसांचा विनाश केला होता असे वर्णन येते. सुंदर नारायण, कैलास मठ अशी अन्य मंदिरेही पाहण्यासारखी आहेत. नाशिकला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment