आता एटीएममधून दरदिवशी काढा २४ हजार रुपये


नवी दिल्ली : प्रत्येक दिवशी एटीएममधून काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा वाढवण्यात आली असून एका दिवशी एटीएममधून एकाच वेळी २४ हजार रुपये काढता येणार आहेत. हा नवा निर्णय एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

प्रत्येक दिवशी एटीएममधून २४ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. आरबीआयने व्यापाऱ्यांना दिलासा देत चालू खात्यावरील सर्व निर्बंध मागे घेतल्याची घोषणा केली असून ही मर्यादा एक फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यापुर्वी दररोज एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा १० हजार रुपये इतकी होती. दर आठवड्याला सेव्हिंग्ज अकाऊण्टमधून जास्तीत जास्त २४ हजार रुपयेच काढता येणार होते (ही मर्यादा अद्यापही कायम आहे) तर करंट (चालू) अकाऊण्टमधून एक लाख रुपयेच काढता येत होते.

येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने लागू केलेली मर्यादा पूर्णपणे शिथील होण्याची चिन्ह आहेत. देशातील नोटांचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असल्यामुळे ही शक्यता वाटत असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तसंस्थेला सांगितले होते.

Leave a Comment