डिप्रेशनचे वाढते प्रमाण


भारताची आर्थिक प्रगती होत आहे परंतु ही प्रगती ज्या औद्योगीकरणाच्या मार्गाने होत आहे. त्या औद्योगीकरणामध्ये अनेक प्रकारचे धोके गुंंतलेले आहेत. या सगळ्या प्रगतीमध्ये स्पर्धा हा स्थायीभाव असतो आणि बिझी लाईफ हा या जीवनाचा पासवर्ड असतो. या पासवर्डमुळे मनोकायिक विकारांची मोठी वाढ होत असते आणि त्यातूनच अनेक प्रकारच्या मानसिक व्याधी उद्भवतात. देशाची जसजशी प्रगती होत आहे तसतसे मनोरुग्णांचे प्रमाणसुध्दा वाढत चालले आहे. मेंटल डिप्रेशन हा अशा मनोरुग्णातला सामान्य विकार आहे. त्यामुळे या विकारासाठी लिहून दिलेल्या औषधांचे प्रमाण २०१६ साली १४ टक्क्यांनी वाढले आहे. २०१५ साली ३ कोटी २५ लाख लोकांनी अशा प्रकारची औषधे घेतलेली होती. परंतु २०१६ साली त्यात १४ टक्क्यांनी वाढ झाली.

ही औषधे लिहून देण्याचे काम एका बाजूला डॉक्टर मंडळी करत असतात तर दुसर्‍या बाजूला मानसिक समुपदेशनाचे काम करणारे मानसोपचार तज्ञही ही औषधे लिहून देत असतात. १४ टक्के वाढ नोंदलेल्या औषधांमध्ये समुपदेशकांनी दिलेल्या चिठ्ठ्यांचाही समावेश आहे. एका बाजूला या १४ टक्के वाढीमुळे डिप्रेशनचे प्रमाण वाढत असल्याचे तर लक्षात येतेच परंतु लोक आता डिप्रेशनसारख्या मानसिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी समुपदेशकांकडे निःसंकोचपणे जायला लागले आहेत. हेही लक्षात येते. अन्यथा लोकांच्या मनामध्ये या संबंधात बरेच गैरसमज होते. धावपळीच्या आयुष्यामुळे, भवितव्याची शाश्‍वती नसल्यामुळे तसेच जीवनातल्या अनिश्‍चिततेमुळे जे मानसिक विकार उद्भवतात ते विकार आणि वेड याच्यामध्ये फरक आहे हेच लोकांना कळत नाही. मानसोपचार तज्ञांकडे समुपदेशनासाठी गेलो तर लोक आपल्याला वेडा समजतील असा लोकांचा समज आहे.

ज्या अर्थी लोक समुपदेशकांकडे जायला लागले आहेत. त्या अर्थी त्यात त्यांना काही संकोच वाटत नाही. लोक आपल्याला वेडा समजतील ही भीतीही वाटत नाही हे आता लक्षात यायला लागले आहे. त्याचबरोबर आणखी एक बदल जाणवत आहे. तो म्हणजे देशात मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक यांची संख्यासुध्दा वाढत आहे. अन्यथा अशा समुपदेशकांची जेवढी गरज आहे. तिच्यामानाने फार कमी समुपदेशक उपलब्ध आहेत असे अनेक दिवसांपासून जाणवत होते. हा अभाव आता दूर होत आहे. असे वाढलेल्या संख्येतून दिसून येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही