मनुष्य व डुकराच्या अंशापासून बनला नवा जीव


माणूस आणि डुकराचे मिश्रण असलेल्या एका नव्या जीवाला जन्म देण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. मनुष्याच्या पेशी कमी प्रमाणात असलेला भ्रूण त्यांनी प्रयोगशाळेत वाढवला आणि नंतर त्याला नष्टही केले. मानवी अवयवांच्या प्रत्यारोपणाला या घटनेमुळे मोठी मदत होणार आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

सॅन डियागो येथील साल्क इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल स्टडीज आणि स्पेनच्या कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ मुरिकाच्या संशोधकांनी हा प्रयोग केला आहे. या प्रयोगात डुकरांचे जवळपास दीड हजार भ्रूण आणि काही मुलांचा खतना केलेल्या काढलेल्या त्वचेतून घेतलेल्या स्टेम सेलचा उपयोग करण्यात आला. हा जीव जन्माला घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी इंजेक्शनद्वारे मानवाच्या स्टेम सेल सोडल्या होत्या. त्यानंतर तो भ्रूण डुकरीणीच्या गर्भात सोडण्यात आला.

या मानवी स्टेम सेलचा विकास होऊन त्यातून डुकराच्या भ्रूणाच्या पेशी विकसित झाल्या. हे भ्रूण २८ दिवसांनंतर डुकरीणीच्या गर्भातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे पिलांच्या स्वरूपात ते विकसित होऊ शकले नाहीत, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली. या तंत्रामुळे डुकर किंवा तत्सम प्राण्यात मानवी अवयव विकसित करता येणार आहेत. त्यातून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळतील, असा अंदाज आहे.

मात्र डुकराच्या भ्रूणात मोठ्या संख्येने मानवी डीएनए टाकण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे मानवी चेहरा असलेले डुक्कर जन्मास येऊ शकतात किंवा डुकरात आढळणारे विषाणू मनुष्यांतही प्रवेश करतील, अशी चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment