ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगल, फेसबुक, अॅपल नाराज


वॉशिंग्टन – अमेरिकेत सात देशांतील मुस्लिम नागरिकांना प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगल, फेसबुक, अॅपल, नेटफ्लिक्‍स यांच्यासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अन्य काही कंपन्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इतर देशातील अभियंते आणि तंत्रज्ञांचे अमेरिकेतील उद्योग, व्यवसायात मोठे योगदान आहे. इतर देशातील मनुष्यबळाचे अमेरिकेत प्रमाणही मोठे आहे. उद्योग-व्यवसायांवर ट्रम्प यांच्या निर्णयामुळे प्रतिकूल परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे गुगलमधील १८७ कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार असल्याचे गुगलने म्हटले आहे. अमेरिकेत कार्यरत असलेल्या गुगलच्या कर्मचाऱ्यांनी देशाबाहेर जाण्याचे कार्यक्रम रद्द करावेत आणि जे कर्मचारी सध्या अमेरिकेत नाहीत त्यांनी कंपनीशी संपर्क साधावा, असे पत्रक गुगलने जारी केले आहे.

अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांच्याकडे अॅपलमधील काही कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यावर कंपनीतील सह-कर्मचारी आणि कंपनीवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबाबत आम्ही व्हाईट हाऊसमध्ये जाणार आहोत, अशी माहिती टीम कुक यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे नेटफ्लिक्‍सच्या जगभरातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे अमेरिका अधिक सुरक्षित नव्हे तर तेथे सुरक्षेचा अभाव जाणवणार आहे, अशा प्रतिक्रिया नेटफ्लिक्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. फेसुबकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनीही ट्रम्प यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment