राज्यपाल पदाची प्रतिष्ठा


मेघालयाचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन यांनी आपल्यावर महिलांच्या संदर्भात काही गंभीर आरोप होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. षण्मुगनाथन हे केवळ मेघालयाचेच राज्यपाल होते असे नाही तर त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेशाच्या राज्यपाल पदाचीही जबाबदारी होती. गेल्या नोव्हेंबरपासून त्यांनी महिलांच्या संदर्भात जे सैल वर्तन केले त्याचा परिणाम म्हणून त्यांना आता राजीनामा द्यावा लागला. त्यांनी आपल्या सेवेतील दोन महिला स्वीय सचिवांना अनावश्यक अनुकूलता दर्शवून मोठ्या पगारावर जनसंपर्क अधिकारी म्हणून नेमले. मात्र या नियुक्त्या करताना त्यांनी या दोन महिलांशी अशिष्ट वर्तन केले. त्यामुळे राजभवनावरील कर्मचार्‍यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहून षण्मुगनाथन यांची तक्रार केली. स्थानिक पातळीवरील काही महिला संघटनांनीही षण्मुगनाथन यांच्याविरोधात आंदोलन केले.

श्री. षण्मुगनाथन यांनी यापेक्षा अधिक शोभा होऊ नये म्हणून स्वतःहूनच पदाचा राजीनामा दिला. षण्मुगनाथन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून ते तामिळनाडूमधले राहणारे आहेत. ६८ वर्षीय षण्मुगनाथन यांनी आपल्या जनसंपर्क अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करताना सरकारी नोकरीत कोणालाही नियुक्त करताना पाळला जाणे आवश्यक असलेला उपचार बाजूस सारला. एवढेच नव्हे तर यातल्या काही महिला कर्मचार्‍यांच्या स्वतः मुलाखती घेतल्या. त्यांच्या पहिल्या मुलाखती संबंधित शासकीय अधिकार्‍यांनी घेतल्या पण शेवटी राज्यपालांनी एक अंतिम मुलाखत घेतली. जी मुलाखत अनावश्यक होती आणि सरकारी नोकरभरती करताना राज्यपालासारख्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती अशा मुलाखती घेत नसते. याचे भान त्यांनी राखले नाही. एकंदरीत महिलांच्या संबंधात त्यांनी अनावश्यक सहानुभूती आणि काही बाबतीत लंपटपणासुध्दा दाखवला. त्या सर्वांचा परिणाम त्यांना भोगावा लागला.

ज्या महिला संघटनांनी त्यांच्याविरुध्द आंदोलन केले त्यांनी राज्यपालांवर राजभवनावर यंग लेडिज क्लब बनवल्याचा आरोप केला. जो पुरेसा बोलका आहे. अशाच पध्दतीने कॉंग्रेसचे नेते नारायणदत्त तिवारी यांनी आंध्राचे राज्यपाल असताना राजभवनाला रंगमंदिर करून टाकले होते. त्यानंतर हे राज्यपाल असेच निघाले. ते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. पण दुर्दैव.

Leave a Comment