आंब्याच्या झाडावर तीन मजली घर


ट्री हाऊस म्हणजे झाडावर बांधली गेलेली घरे हे आपण जाणतो. बहुसंख्य वेळा ही घरे रिसॉर्टमध्ये दिसतात. प्रत्यक्षात झाडावर घरे बांधून कुणी राहात असेल का अशी शंका येऊ शकते. मात्र उदयपूरमधील के.पी.सिंग हे इंजिनिअर त्यांच्या कुटुंबासह गेली सोळा वर्षे आंब्याच्या झाडावर बांधलेल्या आलिशान तीन मजली घरात राहात आहेत.

राजस्थानातील उदयपूर हे पर्यटकांचे विशेष आवडते ठिकाण आहे. येथून जवळच असलेल्या भुवाणा भागात हे अद्भूत घर आहे. त्यातून मालकाने लोकांना निसर्ग संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आंब्याच्या झाडावर असलेले हे घर अनेक पर्यटकांना आकर्षून घेत आहे. विशेष म्हणजे हे घर बांधताना झाड अथवा झाडीची बारीकशी फांदीही कापली गेलेली नाही. झाडावर पक्ष्यांची घरटीही तशीच ठेवली गेली आहेत.

हे घर जमिनीपासून १० ते १२ फूट उंचावर आहे. वर जाण्यासाठी लोखंडाची फोल्डींग शिडी असून ती रिमोटने उघडते. या घरात सर्व सुविधा आहेत. घराला तोलून धरण्यासाठी लोखंडी अँगल वापरले गेले आहेत. घराचे मालक कुलप्रतापसिंग हे व्यवसायाने इंजिनिअर असून या घराचा प्लॉट जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हाच मध्ये असलेले झाड न तोडता घर बांधायचा निर्णय घेतला. या घराची नोंद लिम्का बुक मध्ये करण्यात आली आहे.

Leave a Comment