पावसापासून संरक्षण देणारी ड्रोन अंब्रेला


पावसापासून संरक्षण करायचे तर छत्री हवी. मात्र ती एका हातात धरावी लागते व त्यामुळे बरेचदा अडचण होते. आता मात्र अशी छत्री तयार झाली आहे, जी पावसापासूस संरक्षण देईलच पण हातात धरायचे झंझट राहणार नाही. विशेषतः ज्या भागात कधीही पाऊस कोसळतो, तेथे ही छत्री चांगली उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे ही छत्री तुमच्या डोक्यावर धरण्याचे महत्त्वाचे काम ड्रोनमार्फत केले जाणार आहे.

ड्रोन विक्री कंपनी ड्रोन डायरेक्टने ही अंब्रेला ड्रोन तयार केली आहे. सेमी ऑटोनॉमस ड्रोनची मदत त्यासाठी घेतली गेली आहे. युजरच्या हालचाली ट्रॅक करून ती युजरचा पावसात भिजण्यापासून बचाव करेल. तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. ही छत्री खासकरून यूके साठी बनविली गेली आहे कारण तेथील हवामान अतिशय लहरी आहे व ते कधीही बदलते. ही छत्री कोणत्याही हवामानात उपयुक्त ठरेल. हे ड्रोन अंब्रेला तुमच्या डोक्यावर फिरत राहिल व स्मार्टफोन जीपीएस च्या मदतीने ट्रॅक करेल. तुम्ही जेथे जाल तेथे ते येईल. ती हातात धरण्याची गरज नाही. वादळातही ते सुरक्षित राहीलच पण त्यात असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे की रस्त्यातील झाडे, लँप पोस्ट अथवा भितींना धडकणार नाही.

त्यात ४ केचा कॅमेराही दिला गेला आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचे रेकॉडिगही करू शकता. सध्या यात एकच दोष आहे तो म्हणजे त्याची बॅटरी अर्धा तास चालते. त्यापेक्षा अधिक वेळ वापर करायची वेळ आली तर ही छत्री हातात धरावी लागेल व तिचे वजन आहे दीड किलो. तशी नेहमीच्या छत्रीपेक्षा ती महागही आहे. तिची किंमत ९९७ पौंड असेल असे संकेत दिले गेले आहेत.

Leave a Comment