युती हवीच कशाला ?


प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भाजपाशी असलेली युती आता संपुष्टात आली असल्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी ज्या सभेत केली तिला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी त्यांचा हा निर्णय ऐकताच मोठा आनंद साजरा केेला. घोषणा दिल्या आणि पेढे वाटून आपल्याला हवा तो निर्णय घेतला असल्याची भावना प्रकट केली. याचा अर्थ असा होतो की शिवसैनिकांना ही युती नकोच होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही बातमी ऐकली तेव्हा त्यांचीही प्रतिक्रिया यापेक्षा काही वेगळी नव्हती. कारण त्यांनाही शिवसेनेशी युती नको होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना युती नको होती तर मग नेतेच युती सुरू ठेवण्याचा आग्रह का करीत होते ? शेवटी युती होणे आणि न होणे हे कार्यकर्त्यांसाठीही महत्त्वाचेच असते. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी काडीमोड घेण्याबाबत एवढी उत्सुकता होती की आता ही युती चालू ठेवण्यात काही औचित्य उरले नव्हते. कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ही युती मोडली खरी ती मोडताना त्यांनी जी भाषा वापरली ती अनुचित होती.

ठाकरे यांच्या या युती मोडण्याच्या निर्णयाला माध्यमांत अवाजवी महत्त्व दिले गेले. हे महत्त्व अवाजवी अशासाठी आहे की या दोन पक्षातली युती मोडण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. विधानसभा निवडणुकीत या दोन पक्षांनी युती मोडूनच लढत दिली होती. नंतर झालेल्या नगर पालिकांच्या निवडणुकाही या दोघांनी वेगळे होऊनच लढवल्या होत्या. मग त्यांनी यापूर्वी दोन मोंठ्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या असताना महानगरपालिकांसाठी लढताना त्यांनी काडीमोड घेतल्यावरच माध्यमांनी त्याला एवढे महत्त्व देण्याचे कारण काय ? या वेळच्या काडीमोडाला ठाकरे यांच्या अवास्तव आवेशामुळे महत्त्व आले. त्यांनी मोठ्या स्वाभीमानाचा आव आणून आणि भाजपावर घणाघाती टीका करीत युती मोडल्याचे जाहीर केले. तो आवेश शिवसेनेला शोभणारा असावा कदाचित पण मुत्सद्दीपणाला अजीबात शोभणारा नव्हता. या ठिकाणी ते जे काही बोलले त्याच्या तर्कशुद्धतेवर चर्चा करायची नाही. ते तर्कशुद्ध बोलण्याबद्दल कधीच ओळखले जात नाहीत. पण त्यांनी आणलेला आव अवाजवी होता. आपण आज ज्या पक्षाशी असलेली युती मर्यादित प्रमाणात तोडण्याची घोषणा करीत आहोत ती तोडताना आपण बोलत असलेली भाषा आता यापुढे भाजपाचे तोंडही पाहणार नाही अशा निर्धाराची होती. ती अनुचित आहे.

आपण ज्या पक्षाचे एवढे ताडन करीत आहोत त्याच पक्षाच्या केन्द्रातल्या आणि राज्यातल्याही मंत्रिमंडळात आपले मंत्री आहेत. तिथे आपली युती जारी राहणार आहे. मग ती तिथे जारी राहणार असेल तर एवढी शौर्याची आणि स्वाभीमानाची भाषा कशाला ? भाजपा हा जल्लीकट्टुतला बैल आहे तर त्याच्या सोबत शिवसेनेची ही २५ वर्षे कुजलेली गाय नांदतच कशाला आहे ? भाजपासोबत नांदण्याचे शिवसेना कुजत असेल तर तिला ठाकरे यांनी अजूनही राज्यात आणि केन्द्रात आणखी नासायला, कुजायला कशाला ठेवले आहे? काल त्यांची भाषा ऐकल्यावर आता ते निदान राज्याच्या मंत्रिमंडळातून तरी बाहेर पडतील असे वाटले होते. पण आज सकाळीच खुलासा करण्यात आला की, भाजपासोबत कुजण्याची प्रक्रिया महानगरपालिकेपुरतीच बंद करण्यात येणार आहे आणि राज्य तसेच केन्द्र सरकारमध्ये कुजणे जारी ठेवण्यात येणार आहे. ही खरे तर सत्तेचे लोणी चाटण्या साठीची लाचारी आहे. पण ती तशी न दाखवता, आता आपण बाहेर पडलो तर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल आणि आपण राज्याला अस्थिरतेच्या खाईत ढकलू इच्छित नाही त्यामुळे आपण राज्याच्या मंत्रिमंडळातल्या खुर्च्या उबवणार आहोत असे सांगण्यात आले.

शिवसेना स्वाभीमानाने सत्तेतून बाहेर पडण्याने केन्द्र सरकार तर अजीबातच अस्थिर होणार नाही कारण शिवसेनेचे खासदार बाहेर पडले तरी केन्द्रात भाजपाचे बहुमत आहे. मग उद्धव ठाकरे यांनी केन्द्रातून बाहेर पडून आपण किती स्वाभीमानी आहोत हे दाखवून द्यावे. पण तिथेही बाहेर पडत नाहीत आणि राज्यातही खुर्च्या सोडायला तयार नाहीत. शिवसेने कडून असे स्वाभीमानासाठी सत्ता सोडण्याचे धाडस होणार नाही हे सर्वांना माहीत आहे कारण तसे धाडस असते तर नगर पालिका निवडणुकांत युती तुटली तेव्हाच त्यांनी सत्तेचा त्याग करून भाजपाला चोख उत्तर दिले असते. सेनेला सत्ता सोडवत नाही यात काही अनुचित नाही कारण कोणताही राजकीय पक्ष सत्तेसाठीच राजकारणात उतरलेला असतो. पण निदान एका बाजूला लाचारी करताना दुसर्‍या बाजूला भाजपावर तोंडसुख तरी घेऊ नये. आपण भाजपाशी मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपुरती युती करणार नाही असे संयमाने जाहीर करावे पण लाचारी करायची आणि भाषा मुजोरपणाची करायचंी असा दुहेरी डाव ठाकरे खेळत आहेत. पण त्यांना एवढेही भान नाही की, आपण मारे स्वाभीमानाच्या गोष्टी करीत आहोत पण हे स्वाभीमानाचे सांेंग, राज्यात आणि केन्द्रातल्या युतीचे काय करणार, असा एक सामान्य प्रश्‍न विचारला तरी एका क्षणात उघडे पडून आपले हसे होणार आहे. सत्तेच्या लालसेने शिवसेनेला असे उघडे पाडले आहे.

Leave a Comment