कष्टभंजन हनुमान मंदिरात शनिदेव स्त्रीवेषात स्त्रीवेषात


२६ जानेवारीला भारताचा प्रजासत्ताकदिन साजरा झाला त्याचवेळी साडेसातीसाठी प्रसिद्ध असलेल्या शनिदेवांनी वृश्चिक राशीत प्रवेश केला. भारतात शनिची साडेसाती अतिशय कठीण व त्रासदायक मानली जाते व ज्यांच्या राशीला शनि येतो त्यांच्यावर सतत कांही ना कांही अडचणी येत राहतात. प्राचीन काळापासून साडेसातीचे प्रस्थ भारतात मानले गेले आहे व देवांनाही साडेसातीतून सुटका नाही असा समज आहे. यामुळे या काळात ज्यांच्या राशीला शनि आला आहे ते लोक शनिचा कोप कमी व्हावा म्हणून हनुमानाला साकडे घालतात. या काळात शनीबरोबरच हनुमानाची भक्ती केली जाते.

गुजराथच्या सारंगपूर येथे असलेले हनुमान मंदिर देशातील अन्य मंदिरांपेक्षा वेगळे व वैशिष्ठपूर्ण आहे कारण त्याचा साडेसातीशी संबंध आहे. या मंदिरात हनुमानाच्या पायाशी स्त्री वेशातील शनिदेव आहे. कष्टभंजन हनुमान मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर भव्य व अतिशय सुंदर आहे. महाबली हनुमान हे बालब्रह्मचारी आहेत व स्त्रियांचा आदर करणारे व सन्मान करणारे म्हणूनही प्रसिद्ध आहेत. पौराणिक कथांनुसार हनुमानानी शनिदेवांना वेळोवेळी धडा शिकविला आहे व त्यामुळे शनिदेव हनुमानाला वचकून असतात.


कष्टभंजन मंदिरामागची कथा अशी सांगितली जाते की एकदा असाच शनिचा प्रकोप झाला व त्यामुळे हैराण झालेल्या भाविकांनी हनुमानाला साकडे घातले. शनिदेवाचा राग शांत करण्यासठी हे साकडे होते. तेव्हा भक्ताच्या संकटहरणासाठी हनुमान सज्ज झाले व शनिदेवावर रागावले. हनुमान रागावल्याचे समजताच शनिदेव घाबरले व त्यांनी हनुमान महिलांचे रक्षण व आदर करणारे आहेत हे लक्षात घेऊन स्त्रीरूप धारण केले व हनुमानाच्या पायाशी आश्रय घेतला व पाया पडून क्षमेची याचना केली.

या मंदिरातील हनुमान मूर्तीही अतिशय सुंदर असून भोवती वानरगण आहेत. येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मंदिर एखाद्या किल्ल्याप्रमाणे असून हनुमान सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांना महाराजाधिराज असेही संबोधले जाते. येथे येणार्‍या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे.

Leave a Comment