म्यानमारमधील बागान या प्रसिद्ध पर्यटनस्थळी असलेल्या प्राचीन मंदिरांवर चढण्यास पर्यटकांना बंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी नुकतेच पर्यटकांच्या या कृतीवर टीका केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्यानमारमध्ये प्राचीन मंदिरावर चढण्यास पर्यटकांना बंदी
बागान येथे असलेल्या प्राचीन मंदिरांवरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे, हा म्यानमारमधील पर्यटकांमध्ये लोकप्रिय प्रकार आहे. गेल्या वर्षीही मंदिरांवर चढण्यास प्रतिबंध करणारा आदेश सरकारने दिला होता. मात्र जनक्षोभामुळे तो मागे घेण्यात आला.
“प्राचीन पॅगोडावर पर्यटकांनी चढून सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्यामुळे त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होईल. त्यामुळे आपल्याला याला पर्याय शोधावा लागेल,” असे स्यू की बुधवारी म्हणाल्या होत्या. या ठिकाणी मातीचा उंचवटा बांधावा आणि मंदिराला पर्याय उभा करावा, अशी सूचना जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने सुचविले होते.