महाराष्ट्राच्या अवलियाने समुद्राखाली बांधली लग्नगाठ !


सध्या हटके वेडिंग्ज् चा जमाना असून आता आपल्या सगळ्यांना ‘डेस्टिनेशन वेडिंग’ किंवा ‘थीम वेडिंग’ हे शब्दसुध्दा फारसे अनोळखी राहिलेले नाही. कुठला हॉल बुक करायचा आता यावर ‘टेन्स’होण्याचे दिवस मागे राहिले आहेत. आता सगळ्या वऱ्हाडाला उचलून राजस्थानला वगैरे नेत राजेशाही थाटात लग्नसमारंभ करायचे दिवस आहेत. सांगायचे म्हटले तर टिपिकल लग्नांना फाटा देत यंगस्टर्स काहीतरी वेगळे करू पाहत आहेत.

पण हे केले आहे महाराष्ट्राच्या निखिल पवारने. केरळमधील कोवालम येथे निखिल डायव्हर म्हणून काम करतो. त्याची कामाच्या निमित्ताने स्लोवाकियाच्या युनिका पोग्रॅमशी भेट झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

पण आपले लग्नसुध्दा ‘हट के’ करायचे असे या हट के कपलने ठरवले आणि समुद्राखाली लग्नसोहळा केला. कोवालम बीचजवळच्या समुद्राखाली एक विशेष पोडियम या जोडप्याच्या लग्नासाठी तयार केले गेले. ‘सात फेरे’ समुद्राखाली शक्य नसल्याने ख्रिश्चन पध्दतीने लग्न करायचे ठरले. स्कूबा डायव्हिंगचा पोशाख घालत दोघेही समुद्राखाली खास तयार केलेल्या पोडियमवर एकमेकांच्या बोटात अंगठी घालत विवाहबंधनात अडकले.

त्यांच्या या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याला या दोघांचे मित्रमैत्रिणीही आवर्जून हजर राहिले. आपले भारी ड्रेस मिरवण्याचा काहीच चान्स नसताना या पाहुण्यांनीही स्कूबा डायव्हिंगच्या पोशाख घालत निखिल आणि युनिकाला शुभेच्छा दिल्या. केरळमध्ये आपला लग्नसोहळा करणाऱ्या या जोडप्याने आपल्या लग्नाची नोंदणी महाराष्ट्रात करण्याचे ठरवले.