शाळेतील अभ्यासक्रम कसा असावा, या अभ्यासक्रमात काय काय समाविष्ट असावे यासंदर्भात भारतात अजूनही संभ्रम असून या संदर्भातले निर्णय वेळोवेळी बदलले जातात असा अनुभव भारतीय जनतेला आहे. डेन्मार्कने मात्र भारतातल्या या गोंधळाचा प्रभाव पडू न देता भारताच्या राजस्थान राज्यातील पिपलांत्री गावाचा समावेश त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात आवर्जून केला आहे.
भारताचे हे गांव डेन्मार्कच्या शालेय अभ्यासक्रमात
भारतात मुलीचा जन्म अजूनही साजरा करण्याची मानसिकता नाही. राजस्थानात तर मुलींचा जन्मदर काळजी करण्याइतका घसरलेला असतानाच येथील पिपलात्री गावात मात्र मुलीच्या जन्माचा मोठा सोहळा साजरा केला जातो. राजसमंद जिल्ह्यातील या गावात मुलगी जन्माला आली की आनंदोत्सव साजरा होतो व १११ झाडे लावली जातात आणि काळजी घेऊन ती जोपासली जातात. डेन्मार्क येथून २०१४ मध्ये आलेल्या काही मासमिडीयाच्या विद्यार्थ्यांना ही प्रथा कळली तेव्हा त्यांनी तेथे जाऊन माहिती घेतली व जगातील ११० प्रोजेक्ट मध्ये पिपलांत्री प्रोजेक्ट टॉप १० मध्ये निवडला. त्यामुळे डेन्मार्कच्या प्राथमिक शाळांतून या गावाची माहिती देऊन त्यासंबंधीचे शिक्षण दिले जात आहे.
गावाचे सरपंच श्यामसुंदर पालिवाल यांचे यामध्ये मोठे योगदान आहे. त्यची मुलगी अगदी अल्पवयाची असताना मरण पावली व तिच्या मृत्यूचे दुःख त्यांना सहन झाले नाही. या मुलीची आठवण म्हणून त्यांनी सरपंच या नात्याने गाववाल्याना मुलीच्या जन्माचा सोहळा साजरा करावा तसेच तिच्या नावाने १११ झाडे लावण्याचा नियमच केला. त्यातून ही प्रथा सुरू झाली आहे.