अकबराला चमत्कार दाखविलेले ज्वालामुखी माता मंदिर


हिमाचल प्रदेशाच्या कांगडापासून ३० किमी वर असलेले ज्वालामुखी माता मंदिर देवी सतीच्या शक्तीपीठातील एक मानले जाते. हे ठिकाण अजब, अद्भूत व अविश्वसनीय आहे कारण येथे मूर्ती नाही तर पृथ्वीच्या गर्भातून येणार्‍या नऊ ज्वालांची पूजा येथे केली जाते. या मंदिराशी अनेक कथा निगडीत आहेत. असे मानले जाते की देवी सतीची जी ५२ शक्तीपीठे आहेत, त्यातील या जागी देवी सतीची जीभ पडली होती. या ठिकाणाला जीतावाली, नगरकोट या नावानीही ओळखले जाते. पांडवांनी या जागेचा शोध लावला होता असाही समज आहे.

येथे नऊ वेगवेगळ्या ज्योती असून त्या कधीही विझत नाहीत. त्यांना महाकाली, चंडी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका, अंजीदेवी अशा नावांनी ओळखले जाते. या ज्योतींवरच मंदिर बांधले गेले आहे. अशी कथा सांगतात की अकबराच्या काळात ध्यानू भगत नावाचा एक भक्त १ हजार भाविकांसह या स्थानाच्या दर्शनासाठी जात असताना अकबराने त्याला अडविले. ज्वाला मातेची शक्ती व ध्यानूची भक्ती याची परिक्षा पाहण्यासाठी अकबराने एका घोड्याचे मस्तक कापले व घोडा पुन्हा जिवंत करून दाखविण्याचे आव्हान दिले.

ध्यानूने हे आव्हान स्वीकारले व घोड्याचे मस्तक व धड महिनाभर तसेच जपून ठेवायला सांगितले. ज्वालामुखी मंदिरात पोहोचताच ध्यानू व त्याच्या बरोबरच्या भाविकांनी देवीला साकडे घातले तेव्हा इकडे घोडा जिवंत झाला. नंतर अकबर सैन्यासह येथे आला व त्याने सैनिकांना या ज्वाला पाणी टाकून विझविण्यास सांगितले मात्र खूप पाणी ओतूनही ज्वाला तेवत राहिल्या. तेव्हा अकबराने नतमस्तक होऊन मंदिराला ५० मण सोन्याचे छत बनविले. भूगर्भ शास्त्रज्ञांनी येथे ७० वर्षे सतत संशोधन केले मात्र जवळपास कुठेही नैसर्गिक वायू अथवा तेल साठे असल्याचे आढळले नाही. तरीही या ज्योती कशा पेटत्या राहतात हे गूढ अजून कायमच आहे.

1 thought on “अकबराला चमत्कार दाखविलेले ज्वालामुखी माता मंदिर”

Leave a Comment