सैल जिभा…


निवडणुका आल्या की लोकांना कंठ फुटतात आणि जिभा सैल असलेल्या नेत्यांच्या जिभा आणखी सैल होऊन विरोधकांना फटके मारायला लागतात. अलीकडे एक गोष्ट जाणवायला लागली आहे की, काही विशिष्ट नेते अशा हंगामात नेमके काही तरी अशिष्ट विधाने करतच असतात. त्यांचा आपल्या बोलण्यावर ताबा नसतो. संयम नसतो. काही तरी गंमतीदार बोलून लोकांना रिझवायची त्यांची इच्छा असते आणि त्यानुसार ते काही खुबीदारपणे बोलायला जाऊन वाद ओढवून घेतात. जनता दल (यू) पक्षाचे अध्यक्ष आणि आताच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जाणारे शरद यादव यांनाही अशीच खोड आहे. त्यांनी पाटण्यात भाषण करताना असाच प्रकार करून वाद ओढवून घेतला आहे. त्यांना लोकांसमोर मतदान करण्याचे महत्त्व पटवून द्यायचे होते पण ते देताना ते घसरले.

मतांचे महत्त्व काही कमी नाही. पण ते आपल्या मुलीच्या इज्जतीपेक्षाही जास्त आहे असे सांगताना शरद यादव यांनी विनाकारण गडबड केली. आता एकदा ही अनावश्यक तुलना सुरू केल्यावर त्यांना राहवले नाही आणि त्यांनी मुलीची बेइज्जती कशी किरकोळ असते हेही सांगायला सुरूवात केली. मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व काही लोकांना कळत नाही असे नाही. पण ते सांगताना एवढी तुलना करण्याची काही गरज होती का ? पण काही लोकांना आपण काय बोलत आहोत याचे भानच रहात नाही. यादव यांच्या या विधानावर एवढे वादळ उठले तरी त्यांनी एका शब्दानेही दिलगिरी व्यक्त केली नाही आणि कसला खुलासाही केला नाही. शरद यादव यांचे विधान जनरल होते आणि त्यांनी कोणा मुलीचे नाव घेतले नव्हते म्हणून बरे पण भाजपाचे खासदार विनय कटियार यांना तेवढेही भान राहिले नाही.

गेल्या दोन तीन दिवसांपासून प्रियंका गांधी राजकारणात उतरल्या असल्याने कॉंग्रेसच्या कार्यकत्यार्ंंना फार आनंद झाला आहे. प्रियंका गांधी यांचे व्यक्तिमत्त्व करिष्माई आहे असे सरसकट बोलले जाते. किंबहुना तोच कॉंग्रेसच्या नेत्त्यांचा आधार आहे. पण करिष्माई व्यक्तिमत्त्व आणि स्त्री र्सौंदर्य यांच्यामध्ये एक सीमारेषा असते. ती कटियार यांना लक्षात आली नाही. त्यांनी आपल्या पक्षात प्रियंका गांधी यांच्यापेक्षा अधिक सुंदर महिला नेत्या आहेत अशी फुशारकी मारली. पण अशी विधाने करण्यातून आपण सद्भिरुचीला सुटी देत असतो आणि विनाकारण आपल्या विरोधकांना निमित्त देत असतो हे त्यांना लक्षात आले नाही.

Leave a Comment