वधूला थांबवून नवरदेव प्रेयसीसह फरार!


प्रेम त्रिकोणाच्या सर्व कथांवर मात करणारी घटना केरळमध्ये घडली आहे. वधूला विवाह नोंदणी कार्यालयात बोलावून तिच्या वराने प्रेयसीसह पोबारा केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत वराने पलायन केले ती महिला वाग्दत्त वधूची शेजारीच निघाली. त्यामुळेच हा उलगडा झाला. पोलिसांनी हा वर आणि त्याच्यासोबत फरार झालेल्या महिलेला अटक केली आहे.

अखिलेश सोमण (वय ३० वर्षे) असे या वराचे नाव आहे. मनकुळम येथील एका महिलेसोबत त्याने लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र लग्नाबाबत त्याने काही हालचाल न केल्याने मुलीच्या पालक व नातेवाईकांनी त्याच्यावर दबाव आणला. त्यावेळी विवाहाचे वचन देऊन त्याने मुलीला सोमवारी सकाळी देविकुळम येथील विवाह नोंदणी कार्यालयात बोलावले होते.

मात्र ही महिला आणि तिचे कुटुंबीय त्या कार्यालयात पोचले तेव्हा तिथे अखिलेशचा मागमूसही नव्हता. तेव्हा आपला वर दुसऱ्याच बाईसोबत पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. विवाहाचे आश्वासन देऊन या व्यक्तीने सोने आणि दीड लाख रुपये उकळले असल्याची तक्रार सबंधित महिलेने मुन्नार पोलिसांमध्ये दिली होती. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या वायनाड येथील तुरुंगात त्याची रवानगी केली आहे.

Leave a Comment