नोटाबंदीमुळे तस्करी थांबेल : वर्ल्ड गोल्ड काऊंसिल


जागतिक सोने व्यापाराचे नियंत्रण करणाऱ्या वर्ल्ड गोल्ड काऊंसिल या संघटनेने नोटाबंदीसारख्या भारत सरकारच्या आर्थिक धोरणांची तारीफ केली आहे. या पावलांमुळे तस्करी थांबेल आणि काळा बाजार बंद होईल, असे काऊंसिलने म्हटले आहे.

बुलियन ट्रेडिंग आणि सोन्याचे ब्रँडेड दागिने यांच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचे भारताचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, असे काऊंसिलने म्हटले आहे. काऊंसिलच्या वार्षिक अहवालात या निर्णयाची स्तुती केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा घेतलेला निर्णय मोठ्या ज्वेलरी व्यापाऱ्यांसाठी खूप चांगला ठरेल. मोठ्या ज्वेलरी रिटेलर्सचा भारतातील बाजारपेठेतील वाटा ३० टक्के होता. आता तो २०२० पर्यंत ४० टक्के होईल,” असे वर्ल्ड गोल्ड काऊंसिलचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम म्हणाले.

“पारदर्शकता हेच आज या उद्योगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नोटाबंदीने या आव्हानावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ग्राहकांना मोठे व्यवहार चेक किंवा ऑनलाईनच करावे लागतील,” असे ते पुढे म्हणाले.

भारतात सुमारे चार लाख सोनार असून सोन्याचे ७० व्यवहार आतापर्यंत नगदीने होत होते. यामुळे आणि अलीकडच्या वर्षांमध्ये सोन्यावर लावलेल्या १० टक्के आयात करामुळे तस्करी वाढली असल्याचा दावा सोमसुंदरम यांनी केला.

Leave a Comment