दीव- एक मस्त पर्यटन स्थळ


गुजराथच्या मुख्य भूमीपासून किंचित अलग असलेला निसर्गसंपन्न भूभाग म्हणजे दीव. भारतातील मस्त पर्यटनस्थळातील हे एक ठिकाण. नैसर्गिक आणि मानवनिर्मित सौंदर्यस्थळंाची लयलूट असलेल्या या जागी प्रदूषषरहित स्वच्छ, मोकळी हवा अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळते. या छोट्याशा भूभागावर अनेक मानवनिर्मित वास्तू आहेत ज्या पर्यटकांना खूपच भावतात. दीवचा किल्ला हे त्यातील एक स्थळ.तीन बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेल्या या किल्याची उभारणी खंबातचा राजा बहादूर शहा याने केली अ्रसून त्यांनतर आलेल्या पोर्तुगीजांनी त्यात कांही बदल केले. हा किल्ला दिल्लीच्या लाल किल्यापेक्षा १०० वर्षे अधिक जुना असून किल्ल्यातील प्रमुख जागा कालव्याने जोडल्या गेल्या आहेत. याच किल्ल्यावर अष्टधातूची एक तोफही आहे. अष्टधातूची असल्याने ती उन्हाळ्यातही गरम होत नाही. येथील प्रकाशस्तंभावरून आसपासचा सारा परिसर न्याहाळणे हा एक चांगला अनुभव आहे.


येथे १६१० साली बांधलेले सेंट पॉल चर्च म्हणजे पोर्तुगीज स्थापत्याचा उत्तम नमुना म्हणता येईल. येथे ख्रिस्ताची संगमरवरी मूर्ती आहे. खाडीच्या तोंडावर पाणकोट दुर्ग आहे. येथील किनार्‍यावर गंगेश्वर मंदिर असून खडकात शिवलिंग वसलेले आहे. समुद्राच्या लहरी या शिवलिंगाला सतत अभिषेक करत असतात. तसेच जलंदर बीच जवळ असलेल्या डोंगरावर चंडिका माता मंदिर आहे. सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे हे दीवचे खास वैशिष्ठ. त्यातील नगोआ बीच जास्त प्रसिद्ध असला तरी सूर्यास्ताची शोभा पाहायला चक्रतीर्थ बीचवरच जायला हवे. दीव बेटाचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे दोन फांद्यांची ताडाची झाडे. त्यांना होम्का ताड म्हटले जाते व जगात फक्त येथेच ही झाडे आढळतात. दीव हवाईमार्गे, रस्ता मार्गे अन्य भागांशी जोडलेले असून वर्षाच्या कुठल्याही काळात येथे पर्यटनाचा आनंद लुटता येतो.

Leave a Comment