नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी वयोमर्यादा २५ केली असून त्याचबरोबर या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केवळ ३ प्रयत्न करता येतील अशी तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) साठी तीन प्रयत्न आणि २५ वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित केले असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
फक्त तीनदाच देता येईल वैद्यकीय प्रवेश परीक्षा
वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. तर वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसता येणार आहे. तसेच या परीक्षेला बसण्यासाठी किमान वय हे १७ असणे आवश्यक आहे. नीटसाठी याआधी कुठलीही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती. यामुळे अनेक विद्यार्थी हे वारंवार प्रयत्न करुन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवत होते. तर काही विद्यार्थी हे बीएसस्सीला प्रवेश घेऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षा देत असत. यामुळे परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या वाढत होती. तसेच, कोचिंग क्लासेससाठी ही परीक्षा म्हणजे तर पर्वणीच ठरत होती.
परीक्षेला वारंवार बसून अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाणही अधिक होते. विद्यार्थ्यांसमोर उमेदीची वर्षे वाया गेल्यानंतर कमी पर्याय उपलब्ध राहत असत. युजीसीने या सर्व गोष्टींचा विचार करुन या परीक्षेसाठी वयोमर्यादा आखली आहे. विद्यार्थी जर या निर्बंधामुळे गंभीर असतील तर ते वयाच्या २५ वर्षापर्यंत चांगला अभ्यास करुन परीक्षा देऊन पास होऊ शकतील. तसेच पास न झाल्यास आपल्याला आवडत्या विषयात ते करिअर बनवू शकतील.
पहिल्यांदाच वैद्यकीय प्रवेश परीक्षेवर वयोमर्यादेचे बंधन लावण्यात आले आहे. याआधी काही कोचिंग क्लासेसचे शिक्षक हे स्वतः परीक्षा देत असत आणि पेपर कसा येतो याचा अभ्यास करत असत. परंतु आता ते देखील या परीक्षेला अपात्र ठरतील. दरवर्षी हजारो विद्यार्थी हे ‘रिपीट अटेम्प्ट’ घेतात. त्यामुळे नव्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणून ही वयोमर्यादा गंभीर विद्यार्थ्यांसाठी वरदानच ठरेल असे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये असे आढळले होते की काही ३० वर्षांपुढील उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. एकदा तर एका ३८ वर्षाच्या उमेदवाराने ही परीक्षा दिली होती.