मुंबईच्या डबेवाल्यांची केंद्रीय अर्थसंकल्पात स्वप्नपूर्ती होणार का?


मुंबई: येत्या १ फेब्रुवारीला संसदेसमोर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली अर्थसंकल्प जाहीर करतील. देशात सुरू असलेली निवडणूकांची धामधूम विचारात घेता, यंदाच्या अर्थसंकल्पात अनेकांचे संकल्प मार्गी लागण्याची चिन्हे नाकारता येत नसल्यामुळे अच्छे दिन पाहण्याची संधी अनेकांपैकी काही घटकांना मिळू शकते. पण, मुंबईच्या डबेवाल्यांची स्वप्ने या संकल्पांमध्ये पूर्ण होणार का याबाबत मोठी उत्सुकता आहे. मुंबई लोकलशी संबंधीत मुंबईच्या डबेवाल्यांचे अच्छे दिन हे आहेत. परंतु, यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असे की, यंदा केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचा अर्थसंकल्प समाविष्ठ असेल्यामुळे रेल्वेबाबतच्या अनेक गोष्टी अर्थमंत्री अरूण जेटलीच जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर मुंबईचे डबेवाले हे ‘प्रभू’ आम्हाला पाव असे म्हणण्याऐवजी स्वप्नवत सुविधांचा ‘अरूणोदय’ होणार का याच्या प्रतिक्षेत आहेत.

अवघ्या जगात मुंबईचे डबेवाले प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे इग्लंडच्या राणीसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही कौतूक केले आहे. एवढेच नव्हे तर, जगभरातील अनेक विद्यापीठांनीही मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाची नोंद घेतली आहे. मुंबईचा डबेवाला हा अनेकांच्या संशोधनाचाही विषय ठरला आहे. मात्र, याच डबेवाल्यांची मुंबई लोकलमधील स्थिती ही फार विदारक असते. मुंबईतील अऩेक चाकरमान्यांचा अन्नदाता असलेला हा डबेवाला लोकलच्या गर्दीत स्वत:ची वाट हरवून बसतो. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ही गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने सुरूवातीपासूनच प्रथम क्रमांकाचा डबा, जनरल डबा, अंध अपंगांसाठी वेगळा तर, महिलांसाठीही ही वेगळा डबा सुरू केला आहे. परंतु, असंख्य मुंबईकरांना वेळेवर डबा पोहोचविणाऱ्या मुंबईकरांना अद्यापही वेगळा डबा नाही. आपणास वेगळा डबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांची डबेवाल्यांची मागणी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात डबेवाल्यांसाठी खास डबा मिळेल अशी आशा आहे.

Leave a Comment